आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्तांची सर नाही आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. तो असल्यावर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपट ‘पुष्पक विमान’, प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांची कथा या चित्रपटात आहे. तात्या जळगावमध्ये राहणारे वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्त्व. कीर्तन, भजन आणि शेती यात आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन ही कथा नेहमीच भुरळ घालत असे. हेच तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, तात्या पहिल्यांदा अगदी जवळून उडणारे विमान पाहून भारावून जातात. आयुष्यभर कीर्तनातून ‘तुकाराम महाराजांचा पुष्पक प्रवास’ आनंदाने सांगणाऱ्या तात्यांसाठी ही घटना कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे त्यांच्या इरसाल पण निरागस विश्वात कल्लोळ माजतो. भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी एक गाथा म्हणजेच ‘पुष्पक विमान’ हा चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.
गजेंद्र आहिरेंचा ‘सोहळा’ लवकरच
विक्रम गोखले आणि सचिन पिळगावकर यांच्या मध्यवर्ती भूमिका असणारा अरिहंत फिल्म प्रॉडक्शन्सचा ‘सोहळा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील विशेष म्हणजे, ‘प्यार झुकता नहीं’, ‘तेरी मेहरबानियाँ’, ‘आज का अर्जुन’ इत्यादी यशस्वी चित्रपटाचे निर्माते के. सी. बोकाडिया यांनी सादर केलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून बरेचसे चित्रीकरण कोकणातील रत्नागिरीसारख्या निसर्गरम्य परिसरात करण्यात झाले आहे. या चित्रपटात शिल्पा तुळसकर, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, भारत गणेशपुरे आस्था खामकर यांच्याही भूमिका आहेत.