आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर एकीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. त्याबद्दल आता पीव्हीआरचे सीईओ कमल ज्ञानचंदानी यांनी ब्रह्मास्त्रबद्दल चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात असल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा : “तुझे प्रयत्न कौतुकास्पद…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मानले अक्षय कुमारचे आभार

ब्रह्मास्त्रमुळे पीव्हीआर, आयनॉक्स यांसारख्या चित्रपटगृहांना आठशे कोटींचा फटका बसल्याचे समोर आले होते. व्हायरल झालेल्या त्या पोस्टवर आता पीव्हीआरच्या सीईओंनी स्पष्टीकरण देत ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. खरी आकडेवारी काय आहे आणि कशाप्रकारे ब्रह्मास्त्रबद्दल खोटे पसरविले जात आहे याविषयीही त्यांनी ट्विटकरुन माहिती दिली आहे.

जगभरातून आतापर्यंत या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. पण सोशल मीडियावर एक रिपोर्ट व्हायरल झाला आहे. त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, ब्रह्मास्त्रमुळे चित्रपटगृहांचे ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यावर पीव्हीआरचे सीईओ कमल ज्ञानचंदांनी यांनी एक आकडेवारी व्हायरल करत तो रिपोर्ट खोटा असल्याचे म्हटले आहे. ब्रह्मास्त्रमुळे कोणाचेही नुकसान झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणीतरी जाणीवपूर्वक या चित्रपटाबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

कमल ज्ञानचंदानी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत पसरत आलेल्या नकारात्मक बातम्या पाहून मला धक्का बसला आहे. हे अज्ञानामुळे किंवा जाणूनबुजून द्वेष पसरवण्यासाठी लिहिले आहे का? पण यासाठी आपण आवश्यक बाजूकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पीव्हीआरकडे असलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटामुळे पीव्हीआरची पहिल्या दिवशी आठ कोटींची कमाई झाली आहे. यापूर्वी असं ओपनिंग ‘सुर्यवंशी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ’ला मिळालं आहे.” हे सांगत असताना हाच आठ कोटींचा आकडा रविवारच्या अखेरीस नऊ किंवा दहा कोटींवर जाऊ शकतो अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. यासोबत कमल ज्ञानचंदानी यांनी ट्वीट करत ‘सुर्यवंशी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ’ या चित्रपटांच्यामुळे पहिल्या दिवशी पीव्हीआरच्या झालेल्या कमाईचा आकडाही शेअर केला आहे.

हेही वाचा : “चित्रपट सुरू झाला की…” ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाबद्दल नीतू कपूर यांनी दिली प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट जगभरात ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रमी कमाई केली. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी एकत्र काम केलं आहे. त्या व्यतिरिक्त ‘ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि दिव्येंद्र शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. पण या ट्रेंडचा या चित्रपटावर काही परिणाम झालेला दिसत नाही.