सिनेमाच्या जगातले काही काही याेगायाेग असे काही गंमतीदार असतात की मनमाेहन देसाई यांच्या चित्रपटातील चमत्कार मान्य करावेत. आता हेच पहा ना , बरोब्बर २८ वर्षापूर्वीच्या २९ एप्रिलला त्यावेळच्या युवा पिढीचे जबरदस्त आकर्षण ठरलेले ‘कयामत से कयामत तक’ झळकला व बघता बघता त्याच्या लाेकप्रियतेने “सैराट” रूप धारण केले. नि यावेळच्या २९ एप्रिलला त्याच कयामत से….ची साधारण आठवण देणारा “सैराट” आला.येथे फक्त प्रेमकथा हाच याेग संपताे का?
कयामत….च्या पूर्वप्रसिध्दीला सुरूवात गंमतीदार झाली.आमिर खानपेक्षा दिग्दर्शक मन्सूर खानच्या नावाला पसंती मिळू लागली.कारण काय , तर निर्माता दिग्दर्शक ताहीर हुसेनपेक्षा नासिर हुसेन जास्त यशस्वी व लाेकप्रिय . ‘जब प्यार किसीसे हाेता है’, ‘प्यार का माैसम’, ‘बहाराे के सपने’, ‘कारवाँ’, ‘यादाे की बारात’ आणि ‘हम किसीसे कम नही’ वगैरे यशस्वी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा मुलगाच दिग्दर्शक झाला म्हणून मन्सूरच्या नावाला जास्त पसंती. जुहूूच्या एका पंचतारांकित हाँटेलमधील या चित्रपटाच्या ध्वनिफीत प्रकाशन पार्टीच्या वेळचा आमिर अगदी महाविद्यालयीन विद्यार्थी जणू. तसाच उत्साह व आशावाद. जुही चावलाने “सल्तनत” चित्रपटाचे अपयश पचवलेले. तिच्या वागण्यात सहजता. संगीतकार आनंद मिलिंद हे चित्रगुप्त यांची मुले म्हणून ते पित्याचा संगीत वारसा पुढे नेत आहेत म्हणून कुतुहल. गंमत म्हणजे या चित्रपटापासून ‘नासिर हुसेन प्राँडक्शन’ने आपला युवा विभाग सुरू करताना जवळपास सर्व नवे वा नुकतेच या क्षेत्रात आलेले चेहरे व तंत्रज्ञ घेतले.अपवाद गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांचा. त्यानी ‘पापा कहते है बडा नाम करेगा…’ सारखे युवा पिढीचे मन जिंकेल असे गीत लिहून आपले तरूण मन स्पष्ट केले.
नासिर हुसेन यानी दिग्दर्शन संन्यास घेउन पुढच्या पिढीकडे सूत्रे दिली हे कयामत…च्या पाेस्टरपासूनच जाणवले. तुमच्या शेजारचाच….असे सांगत आमिर झळकला. आम्हा समिक्षकाना स्वतंत्र खेळ आयाेजित करण्याएेवजी मुख्य चित्रपटगृह अप्सरात मँटीनी खेळाला बाेलावल्याने रसिकांचे भरभरून प्रेम अनुभवायला मिळाले. चित्रपट राैप्यमहाेत्सवी यश संपादणार हे पहिल्याच खेळाला जाणवले.
चित्रपटात घरच्यांच्या विराेधाशी संघर्ष करीत साकारलेली प्रेमकथाच. तात्कालिक युवा पिढीची भाषा, मानसिकता दृष्टी त्यात हाेती हे महत्वाचे ठरले. तेच तर महत्वाचे असते. बघता बघता चित्रपटाने लाेकप्रियतेने सैराट रूप धारण केले.आमिर व जुही स्टार झाले. नवीन चेहरे रसिकांना आवडले… आताच्याही २९ एप्रिललाही तेच झाले. पण सैराटची ” खाेली” काही गाेष्टींचा विचार करायला लावते…

Story img Loader