‘क्वीन’साठी सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला तेव्हा कंगना राणावत हरयाणात ‘तनू वेड्स मनू’च्या सिक्वलचे चित्रिकरण करत होती. त्यामुळे पुरस्कार जाहीर होऊनही आत्तापर्यंत शांत असलेल्या कंगनाला या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना पहिल्यांदा आठवण झाली ती ‘क्वीन’ चित्रपटाचे छायाचित्रण करणाऱ्या बॉबी सिंगची. ‘क्वीन’ चे छायाचित्रण बॉबी सिंग यांनी केले होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच बॉबी सिंगचे अस्थमामुळे निधन झाले. ‘क्वीन’मध्ये मला लोकांनी बॉबीच्या नजरेतून पाहिले आहे. हा चित्रपट म्हणजे बॉबीने मला दिलेली शेवटची भेट आहे, असे कंगनाने सांगितले.
‘क्वीन’ चित्रपटाचे नव्वद टक्के छायाचित्रण बॉबी सिंग यांनी केले होते. त्यानंतर अखेरचे चित्र सुरू होण्याआधीच बॉबीचे निधन झाले. मात्र, कंगना आणि बॉबीची ओळख ही फक्त ‘क्वीन’पुरती मर्यादित नव्हती. चित्रपटसृष्टीत सिप्पींकडे सहाय्यक कॅ मेरामन म्हणून सुरूवात केलेल्या बॉबी सिंग यांनी स्वतंत्रपणे कॅ मेरामन म्हणून अनुराग बसू दिग्दर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटापासून सुरूवात केली होती. योगायोगाने, ‘गँगस्टर’ हा कंगनाचाही पहिला चित्रपट होता. त्यानंतर पुन्हा अनुराग बसूच्याच ‘लाईफ इन मेट्रो’ चित्रपटासाठीही त्या दोघांनी एकत्र काम केले होते. त्यामुळे ‘क्वीन’साठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कंगनाला त्याची आठवण पहिल्यांदा झाली नसती तरच नवल. आमच्या एकत्र प्रवासाची सुरूवात ‘गँगस्टर’पासून झाली होती आणि हा प्रवास खूप खास होता. ‘क्वीन’ हा बॉबीचा अखेरचा चित्रपट ठरला. मात्र, याही चित्रपटात लोकांनी मला त्याच्याच नजरेतून पाहिले आहे. म्हणून, ‘क्वीन’ ही नेहमीच बॉबीने आपल्याला दिलेली अखेरची भेट असेल, असे कंगनाने सांगितले.