कोणी हिरो नाही, मसाला कथानक नाही आणि तरीही सुंदर कथा, अभिनय आणि गाणी यांच्या जोरावर कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या ‘क्वीन’ चित्रपटाने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला. कंगना, राजकुमार आणि लिसा हेडन अशी तीनच परिचित नावे असूनही या चित्रपटाने ७० कोटींच्या वर कमाई केली. हा चित्रपट केवळ हिंदीतच गाजला नाही तर दक्षिणेकडचे लोकही या चित्रपटाच्या प्रेमात पडले असून चार दाक्षिणात्य भाषेत या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे.
सुप्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक थिगराजन यांनी ‘क्वीन’ चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून या चित्रपटाचा तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये रिमेक करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. ‘क्वीन’ चित्रपट माझ्या मनाला भिडला. चित्रपट पाहून झाल्यावरही दीर्घकाळ तो माझ्या मनात रेंगाळत होता. हा चित्रपट समजून घेण्यासाठी तुम्हाला भाषेची अडचण येत नाही. आणि हेच या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे की भाषा, संस्कृती यांच्यापलीकडे जाऊन हा चित्रपट प्रेक्षकांशी संवाद साधतो. या वैशिष्टय़ामुळेच चित्रपटाचा रिमेक करण्याची कल्पना मला सुचली. चारही भाषांच्या रिमेकवर एकाचवेळी काम सुरू होणार असून २०१५ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा आपला मानस असल्याचे थिगराजन यांनी सांगितले.
रिमेक चित्रपटात ‘राणी’ची म्हणजेच कंगनाने साकारलेली भूमिका कोण करणार?, याबद्दल अजून काहीच निश्चित झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाच्या नायिकेसाठी मला एकाचवेळी गंभीरपणे वावरणारी पण, कोणाचीही तमा न बाळगता स्वत:ला झोकून देणारी अभिनेत्री हवी आहे. बॉलिवूडच्या आत्ताच्या आघाडीच्या अभिनेत्री ही कमी पूर्ण करू शकतील मात्र, अजून याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे थिगराजन यांनी म्हटले आहे. राणीच्या मैत्रिणीची भूमिका करणारी लिझा हेडन रिमेकमध्येही त्याच भूमिकेत असणार आहे, असे त्यांनी सांगितले. राजकुमारच्या भूमिकेसाठी आपला मुलगा दाक्षिणात्य अभिनेता प्रशांतबद्दल विचार सुरू आहे. पण, अंतिम निर्णय त्याचाच असेल असे त्यांनी सांगितले आहे. प्रशांतने याआधी हिंदीत ‘जीन्स’ चित्रपटात ऐश्वर्याबरोबर काम केले होते. आत्ताही तो आणखी एका हिंदी चित्रपटात काम करत आहे. ‘क्वीन’मधील राजकुमारच्या व्यक्तिरेखेला नकारात्मक छटा आहे. त्यामुळे आत्ता कारकिर्दीच्या या टप्प्यावर अशी नकारात्मक व्यक्तिरेखा करायची की नाही, याचा निर्णय प्रशांतनेच घ्यायला हवा, असे थिगराजन यांचे म्हणणे आहे. ‘क्वीन’चा दिग्दर्शक विकास बहल या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे खूष आहे. मी मनापासून हा चित्रपट बनवला आहे त्यामुळे संपूर्ण दक्षिणेत त्याला जो प्रतिसाद मिळतोय ते बघून आनंद झाल्याचे विकास बहल यांनी सांगितले.