स्त्रीलिंग, पुल्लिंग सेम थिंग..!
या टॅगलाइनने आर.बाल्कीच्या नव्या चित्रपटाची सुरुवात होते. समाजाने ठरवून दिलेल्या परंपरागत भूमिका स्त्री-पुरुषांनी बदलायच्या ठरवल्या तर काय गंमत होईल, असा विचार करून मराठी आणि िहदीतही याआधी फँटसीपट आले आहेत. मात्र हे तिचं आणि ते त्याचं असं मुळात काही नसतं, या विचारापासून ‘की अँड का’ची सुरुवात होते, असं ‘आयडिया’ची कमी नसलेल्या या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. म्हणजे याही चित्रपटाची आयडिया अशी खिडकीत बसल्या बसल्याच सुचली असं जाहिरात ते चित्रपट दिग्दर्शनापर्यंत प्रवास करणाऱ्या या कल्पनांच्या बादशहाने सांगितलं.
‘मला या वेळी प्रेमकथा करायची आहे या विचारानेच खिडकीत विचार करीत बसलो होतो. आपल्याकडच्या प्रेमकथा मुलगा मुलीला भेटतो इथून सुरू होतात. आणि ते लग्न करून सुखाने नांदू लागले इथे संपतात. कारण असंही वैवाहिक जीवन नीरस असतं, प्रेम संपलेलं असतं, अशा सगळ्या गोष्टी वर्षांनुवर्षे डोक्यात बसलेल्या असतात. त्यामुळे विवाहानंतरचीच प्रेमकथा असायला हवी, त्यात तो रोमान्स आला पाहिजे. असा विचार करत करत मग त्यात ‘की’ आणि ‘का’ आले.. बाल्कीचे हे सहजकथन ऐकताना इथे थांबा लागला. ‘की आणि का’? एवढं म्हटल्यावरच आपल्याला उत्तर मिळतं. कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्ट िलगभेदावर आधारलेली आहे. बस, स्कूटरपासून माणसांपर्यंत सगळ्यांना िलग आहे आणि त्यानुसार त्यांच्या उच्चारानुसार भूमिकांपर्यंत सगळं ठरलेलं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत की आणि का शोधायची सवयच जडलेली आहे, असं बाल्की सांगतात. त्यामुळे या नव्या चित्रपटात स्त्री-पुरुषांच्या बदलत्या नात्यांची कथा पाहायला मिळणार आहे. पण म्हणून हा चित्रपट कुठल्या तरी भारी संकल्पनेवर वगरे आहे, असा समज कृपया कोणी करून घेऊ नका, असा आग्रहही त्यांनी धरला.
आपल्याकडे स्त्रियांनी शिकून करिअर केलं पाहिजे आणि त्या कितीही मोठं काम करीत असल्या तरी घराची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली पाहिजे. पुरुषांनी बाहेर काहीही काम करू देत त्यांनी घरच्या कामांची दखल घेणं गरजेचं नाही. जर एखाद्याने घराचीच पूर्ण जबाबदारी घेणं पसंत केलं म्हणजे तो बदलला असं होत नाही ना.. त्याही परिस्थितीत त्यांचं मन, त्यांच्या भावना, त्यांच्यातली भांडणं आणि प्रेम या सगळ्या गोष्टी तशाच घडणार आहेत. म्हणून स्त्रीिलग आणि पुल्लिंग असं काही नसतं.. याबाबतीत स्वत:च्या आयुष्यातील अनुभवाबद्दल बोलताना आमचा तर ‘की आणि का’ एक पुरुष आहे. तोच आमचे घर सांभाळतो, तोच आमच्यासाठी जेवण करतो, असं बाल्की म्हणतात. ‘की अँड का’ची संकल्पना लोकांना पसंत पडली आहे, ते त्यावर निदान चर्चा करतायेत यातून त्यांना या विषयाबद्दल असलेली उत्सुकता जाणवते असं सांगणारे बाल्की आपली पत्नी दिग्दर्शक गौरी िशदेने मात्र याबाबतीत आपल्याला खोटं ठरवलं असल्याचं मनमोकळेपणे सांगितलं. मी ज्या पद्धतीने कथा-व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून नवे विचार मांडतो तसं मी प्रत्यक्षात कधीच जगत नाही, असा गौरीचा आरोप आहे. पण माझ्या व्यक्तिरेखांप्रमाणे मी जगावं यात काय गंमत आहे, असा उलट युक्तिप्रवाद करण्याचा माझा आपला प्रयत्न असतो, असं ते गमतीने म्हणतात. बाल्कीच्या ऑफिसमध्ये ‘जिथे चहा आहे तिथे आशा आहे’ या आशयाची एक फ्रेम लावलेली दिसते. त्या फ्रेमच्या बाबतीतही, नाही नाही, मी स्वत: कॉफीचा चाहता आहे, ती गौरीने लावलेली फ्रेम आहे. बघ! माझ्या ऑफिसमध्येही माझ्या पत्नीचेच नियम लागू होतात, असं ते मिश्कीलपणे सांगतात.
अर्जुन कपूर आणि करीना कपूर ही आत्तापर्यंत न पाहिलेली जोडी या चित्रपटातून एकत्र येते आहे, याबद्दल बोलताना कलाकारांची निवड ही योग्य असायलाच हवी, असं त्यांनी सांगितलं. या चित्रपटात अर्जुनच मला हवा होता. तो शरीराने मोठा बांधा आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेला पुरुष आहे. पण मनाने हळवा आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वातील हा विरोधाभास मला भूमिकेसाठी हवा होता. कसं आहे ना, आपण कित्येकदा असं थोडंसं हळवं वागलं की तो बायकांसारखा वागतो आणि रांगडं वागणाऱ्या वरून मुलींना ती तर अर्धा मुलगाच आहे, अशी सहज लेबल्स लावून टाकतो. मला माझ्या कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वातूनच या विषयावर भाष्य करायचं होतं, असं त्यांनी सांगितलं. मात्र करीना आणि अर्जुनला एकत्र आणण्याची कल्पना आपली नव्हती हेही त्यांनी स्पष्ट केलं. गौरीकडे करीना आणि अर्जुनचं एक एकत्र छायाचित्र आलं होतं. आणि कुणी तरी विनंती केली होती की बाल्कीला या दोघांना घेऊन एकत्र चित्रपट करायला सांगा. पहिल्यांदा मी हे हसण्यावारी नेलं होतं. मग अरे, का नाही, असा विचार केला. मला ही जोडी पटली. खरं तर, अर्जुनपेक्षा करीनासाठी या चित्रपटातील भूमिका अवघड होती. पण या दोघांनीही आपलं असं काही या चित्रपटासाठी दिलं आहे, अशा शब्दांत बाल्कीने आपल्या या कलाकार जोडीचं कौतुकही केलं.
एकाच वेळी जाहिरात कंपनीचा प्रमुख आणि सर्जनशील चित्रपट दिग्दर्शक या दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या बाल्कींसाठी जाहिरात हीच आवडती गोष्ट आहे. सतत नवनवीन कल्पनांवर काम करण्याची संधी फक्त जाहिरातीतून मिळते. चित्रपट म्हटला की वर्षभराची मेहनत आली, असं ते म्हणतात. मला सतत आयडिया सुचतात आणि त्या आयडियांवर झटपट काम करणं हाच माझा ध्यास असतो, असं हा ‘आयडिया’बाज दिग्दर्शक सांगतो. आत्ताही अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नव्या चित्रपटाच्या आयडियावर त्यांचं काम सुरू झालं आहे.
अमिताभच आदर्श
कलाकार म्हणून अमिताभ आणि चित्रपटासाठी दाक्षिणात्य सिनेमॅटोग्राफर पी. सी. श्रीराम या दोन व्यक्ती बाल्कीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. आत्तापर्यंत बाल्कीने पी. सी. श्रीराम यांच्याबरोबरच काम केलं आहे. दिग्दर्शकासाठी त्याला जे सांगायचं आहे ते कॅमेऱ्यातून उतरवण्याचं कसब हे फक्त सिनेमॅटोग्राफरचं असतं. माझ्या चित्रपटात कुठेही उटी-काश्मीर नाही. हिरवा बहरलेला निसर्ग वगरे नाही. माझ्याकडे फक्त एक नायक-नायिका आहेत. त्यांच्या गप्पांमधून हा चित्रपट घडतो. अशा वेळी त्यांच्या नजरेतलं सौंदर्य, त्यांच्या असण्यातून घडत जाणारी कथा टिपणारी जाणकार नजर असायला हवी. पी. सी. याबाबतीतील माहीर कलावंत आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रपटासाठी त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न असतो, असं बाल्कींनी सांगितलं. तर अमिताभ म्हणजे जादूची पेटी आहे, असं ते म्हणतात. त्यांच्याकडून जितकं काढून घ्याल तितकं कमी आहे. मला स्वत:ला जे कलाकार माहिती आहेत त्यांच्यासाठी कथा लिहायला आवडतं. त्यांची व्यक्तिमत्त्वं लक्षात घेऊन नवं काही कथेत निर्माण करता येतं. अमिताभ यांच्याबाबतीत तर अजून खूप काही शोधायचं आहे असं सांगणाऱ्या बाल्कींसाठी नव्या पिढीचा कलाकार म्हणूनही अमिताभच आदर्श आहेत.