आर माधवनचा साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सगळ्यांना थक्क करणारा आहे. आज दोन्ही ठिकाणी माधवनचा मोठा चाहतावर्ग आपल्याला बघायला मिळतो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २०२२ मध्ये त्याने ‘रॉकेटरी द नंबी इफेक्ट’ हा बायोपिक चित्रपट केला, ज्यामध्ये तो प्रसिद्ध आणि नावाजलेले वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या भूमिकेत दिसला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आणि या चित्रपटातील माधवनच्या अभिनयालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
आता आर माधवन पुन्हा एका नव्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. नुकतंच आर माधवनच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आता तो महान शास्त्रज्ञ जीडी नायडू यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जीडी नायडू यांना ‘एडीशन ऑफ इंडिया’ आणि ‘वेल्थ मेकर ऑफ कोईम्बतूर’ म्हणतात. त्यांनी डी. बालसुंदरम नायडू यांच्या सहकार्याने पहिली भारतीय इलेक्ट्रिक मोटर विकसित केली होती. या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.
आणखी वाचा : राजेश खन्ना यांनी अमोल पालेकरांना मारलेली लाथ; ‘या’ सीनमुळे निर्माण झालेली दोघांच्या मैत्रीत दरी
जीडी नायडू यांचा वारसा देशातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटरच्या निर्मितीशी जोडलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती मीडिया वन ग्लोबल एंटरटेनमेंट लिमिटेड करणार आहे. नुकतंच चित्रपटाच्या टीमने कलाकारांच्या तपशीलांसह चित्रपटाचे अधिकृत पोस्टर देखील जारी केले आहे. जीडी नायडू यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतची कथा चित्रपटात उलगडणार आहे.
माधवनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर रिट्विट केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक व्यक्ती कारकडे पाहत उभी असलेली दिसत आहे. वास्तविक पाहता पोस्टरच्या माध्यमातून जीडी नायडू त्यांच्या गॅरेजमध्ये उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे, जिथे त्यांनी इलेक्ट्रिक मोटरचा शोध लावला होता. या नव्या घोषणेनंतर माधवनचे चाहते खूप खूश आहेत आणि सोशल मीडियावर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.