सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार वेबविश्वाकडे वळले आहेत. आता जमानाच वेबसीरिजचा आहे आणि त्यातच मराठीमध्ये देखील वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच बहुचर्चित वेबसीरिज म्हणजे ‘रानबाजार’. ही मराठीमधील सर्वात बोल्ड सीरिज प्रदर्शित झाली आणि या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
‘रानबाजार’चे ३ भाग प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. या तीनही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वेबसीरिजला मिळत असलेला प्रतिसाद पाहून ‘रानबाजार’चे पुढील भाग लवकरच प्रदर्शित होणार आहेत. अगदी कमी वेळात सीरिजला अधिक प्रतिसाद मिळाल्याने ‘रानबाजार’ची संपूर्म टीमदेखील भारावून गेली आहे. असंच काहीसं घडलं होतं… कदाचित? अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘रानबाजार’च्या ट्रेलरला लाखो लोकांनी प्रतिसाद दिला होता.
आणखी वाचा – “पुष्पा, आरआरआर चित्रपट सुपरहिट ठरले आणि…”, बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर स्पष्टच बोलला करण जोहर
या वेबीसीरिजचा तिसरा भाग पाहता पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. फक्त बोल्ड सीन्स किंवा अपशब्दांचा वापर केलेली ही वेबसीरिज नसून याचे कथानकही तितकंच उत्तम आहे. या सीरिजच्या चौथ्या भागात काय घडणार आणि ही कथा नक्की कुठे येऊन थांबणार हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. ‘रानबाजार’च्या निमित्ताने मराठीमध्ये नवा प्रयोग करण्यात आला आहे.
आणखी वाचा – Photos : १६ वर्षांची मेहनत, ३६ पैकी फक्त ५ चित्रपटच ठरले सुपरहिट, कंगना रणौतच्या करिअरला उतरती कळा?
‘रानबाजार’चे पुढील भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच २७ मे रोजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठीने केली असून अभिजीत पानसे यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.