मराठीसह, साऊथ आणि बॉलीवूड क्षेत्रात आपलं नाव गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे (Radhika Apte). आपल्या सशक्त अभिनयाने राधिकाने मनोरंजनाची मोठी स्क्रीन असो वा ओटीटीद्वारे मोबाइलची छोटी स्क्रीन असो, अशा सर्वच क्षेत्रांत आपली मुशाफिरी केली आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी राधिकाने आई झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती. मुलीला जन्म दिल्याच्या एक आठवड्यानंतर राधिकाने चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली होती.

मुलीच्या जन्मानंतरचे अनेक खास क्षण राधिकाने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केल्याचे पाहायला मिळाले. तिने बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटोही शेअर केला होता आणि या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. राधिकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती एकीकडे लॅपटॉपवर काम करत होती, तर दुसरीकडे मुलीला स्तनपानही करत होती. अशातच आता तिने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

राधिका आपटे लेकीला घेऊन मायदेशी म्हणजेच भारतात परतली आहे. लेकीच्या जन्मानंतर राधिका पहिल्यांदाच भारतात परतली आहे. याबद्दल तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर क्यूट फोटो शेअर केला आहे. यामध्ये राधिकाने आपल्या लेकीला छातीशी घट्ट धरलं आहे. यात तिने लेकीचा चेहरा मात्र लपवला आहे. या फोटोसह तिने “मातृभूमीत पाऊल ठेवलं. आईने मुंबईशी ओळख करून देण्यासाठी काय चांगला महिना शोधलाय” असं हटके कॅप्शनही लिहिलं आहे.

लंडनसारख्या वातावरणातून थेट मुंबईत आल्याने राधिकाने असं कॅप्शनही लिहिलं आहे. दरम्यान, राधिकाच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचं आणि लेकीचं मुंबईत स्वागत केलं आहे. दिया मिर्झा, झोया अख्तर, अनिता दाते-केळकर यांसारख्या कलाकारांनी तिचं स्वागत केलं आहे. तसंच राधिकाला पुन्हा मुंबईत आल्याचं पाहून चाहतेही खूश झाले आहेत. तशा प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, राधिकाने बेनेडिक्ट या ब्रिटिश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकाराबरोबर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिने मुलगी झाल्याची गुडन्यूज दिली होती. तिने तिच्या प्रेग्नेन्सीची वेगळी घोषणा केली नव्हती. एका कार्यक्रमात ती बेबी बम्पसह दिसल्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या चाहत्यांना समजले होते. अशातच आता अभिनेत्री लेकीला घेऊन भारतात परतली आहे.