हिंदी चित्रपटसृष्टीत दोन अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी कधीच होऊ शकत नाहीत, असे नेहमीच बोलले जाते. किंबहुना, एका सेटवर दोघी असल्याच तर बघा त्या कशा भांडत आहेत, हे सोदाहरण पटवून देण्याची चढाओढ लागलेली असते. हिंदी चित्रपट अभिनेत्रींसाठी ही नित्याची बाब झाली असली तरी हिंदीत पहिल्यांदाच एकत्र काम करण्याचा योग आलेल्या दोन मराठी अभिनेत्रींनाही या गैरसमजाचा फटका बसला आहे. ‘हंटर’ या चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या राधिको आपटे आणि सई ताम्हणकर या दोन अभिनेत्रींमध्ये विस्तवही जात नसल्याच्या चर्चाना पेव फुटले होते. मात्र, हे सगळे ऐकून आम्ही दोघीही पोटभर हसलो, असे राधिकाने ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
सई आणि मी खूप आधीपासून एकमेकींना ओळखतो. मात्र, आम्हाला एकत्र काम करायचा योग येत नव्हता. ‘हंटर’ या चित्रपटात आम्ही दोघीही काम करत असलो तरी गंमत म्हणजे या चित्रपटातही आम्हाला दोघींना एकत्र काम करायला मिळालेले नाही. उलट, आता प्रसिद्धि कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही दोघीही एकत्र आलो आहोत, असे राधिकाने सांगितले. राधिका हे हिंदीसाठी नवीन नाव नाही. राधिकाने हिंदी ते मराठी चित्रपट असा प्रवास केला आहे. तर सई सध्या मराठी चित्रपटांमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याआधी सईने हिंदीत भूमिका केली असली तरी ‘हंटर’ हा तिचा खऱ्या अर्थाने पहिला हिंदी चित्रपट आहे.  राधिकाला या चित्रपटात जास्त प्रसिद्धी मिळत असल्यामुळे सईला तिचा राग येतो आहे. मात्र, सगळीकडे या चर्चा ऐकल्यानंतर आम्हाला दोघींनाही हसू आवरत नव्हते, असे राधिकाने सांगितले. आम्ही दोघीही चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यामुळे या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे राधिकाने स्पष्ट केले.

Story img Loader