चित्रपटातील बोल्ड सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावणे सुरुच ठेवले आहे. अजय देवगणचे दिग्दर्शन असलेला शिवाय या चित्रपटातील बोल्ड सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कट केले आहेत. याशिवाय राधिका आपटेच्या बहुचर्चित पार्च्ड या सिनेमातील बोल्ड दृश्यांवरही सेन्सॉरने कात्री मारली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या संस्कारी भूमिकेचा निषेध होत असून यापूर्वीही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स असायचे. मग आता त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.
बॉलिवडूमध्ये चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स असणे यात काही नवीन नाही. मर्डर या चित्रपटापासून सुरु झालेला हा सिलसिला हेटस्टोरी, हंटर, बी ए पास, शूटआऊट अॅट वडाला या चित्रपटांमध्येही दिसून आला. विशेष म्हणजे या चित्रपटांमधील प्रणयदृश्यांवर सेन्सॉर बोर्डानेही कात्री फिरवली नव्हती. बोल्ड विषय असल्याने बी ए पास या चित्रपटात बोल्ड सीन्सचा समावेश होता. त्या चित्रपटाच्या कथानकाची ती गरज होती. मात्र शिल्पा शुक्ला आणि शादाब यांच्यातील फक्त बोल्ड दृश्यांमुळे या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली नाही. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य पुरस्कार मिळवले.
मराठमोळी सई ताम्हणकर, राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘हंटर’ या चित्रपटतील बोल्ड सीन्सही गाजले. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एका वेगळ्या आणि नव्या कथानकाला हात घालण्यात आला होता.
‘रागिनी एमएमएस’, ‘मर्डर २’, ‘काइट्स’ या चित्रपटांतील बोल्ड सीन आणि कलाकारांची केमिस्ट्री बरीच चर्चेत आली होती. कथानकाची गरज पाहता काही चित्रपटांमधील भडक प्रणयदृश्यांवर कात्री मारली जात नाही. पण असे असले तरीही काही चित्रपटांच्या बाबतीत सेन्सॉरची वागणूक पाहता त्यावर आजवर अनेकांनीच नाराजी व्यक्त केली आहे.