दिग्दर्शक अनुराग कश्यपने तयार केलेल्या एका लघु चित्रपटासाठी अभिनेत्री राधिका आपटेवर चित्रीत झालेले एक न्यूड दृश्य सोशल प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. या प्रकारामुळे अनुराग कश्यप चांगलाच संतप्त झाला आहे. काही महिन्यांपूर्वी अनुराग कश्यपने एक लघु चित्रपट तयार केला होता. त्यामध्ये राधिकाने बोल्ड सीन दिला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी या दृश्याची क्लिप लीक करण्यात आली. सध्या वॉट्स अॅप व अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर ही क्लिप झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अनुराग कश्यपने थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
राधिकाने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, अनुराग कश्यपने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला आहे. एका सत्यकथेवर मी २० मिनीटांचा लघु चित्रपट तयार केला होता. हा चित्रपट लंडन येथे होणा-या चित्रपट महोत्सवासाठी पाठवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या संहितेच्या मागणीनुसार राधिकाला हा बोल्ड सीन द्यायचा होता व तिनेही धाडस दाखवत हे दृश्य दिले होते. चित्रीकरणादरम्यान आम्ही फक्त महिलांनाच तिथे उपस्थित राहण्यास परवानगी दिली असल्याचे अनुरागने सांगितले. या दृश्याचे गांभीर्य लक्षात घेता चित्रीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर या दृश्याच्या कामात महिलांचाच सहभाग राहील, याची खबरदारी घेण्यात आली होती. मात्र तरीही कोणीतरी हे दृश्य लीक केल्याचे अनुरागतर्फे सांगण्यात आले.
राधिकाने माझ्यावर विश्वास दाखवत हे दृश्य चित्रीत केले होते. पण दुर्दैवाने हा व्हिडीओ लीक झाल्याने राधिकाची खिल्ली उडवली जात आहे. या प्रकारासाठी मी स्वतःला जबाबदार धरत असून पोलीस आयुक्त राकेश मारियांकडेही मी तक्रार केली आहे असे त्याने सांगितले. ही क्लिप लीक करुन सोशल मिडीयावर पसरवणा-यांचा शोध लागेपर्यंत मी गप्प बसणार नाही अशी शपथच त्याने घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा