बॉलीवूडचा शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन या वयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात काम करत असतात. अभिनयासह सोशल नेटवर्किंग साइट्सवरील ‘फेसबुक’, ट्विटर’ यावर तसेच ‘ब्लॉग’च्या माध्यमातूनही ते सक्रिय असतात. कधी दूरचित्रवाहिन्यांवर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतही ते पाहायला मिळतात. अमिताभ यांच्या चाहत्यांना आता त्यांचे नवे रूप पाहायला मिळणार असून गुरुवारी ते एका खासगी एफ. एम. रेडिओ चॅनेलवर ‘रेडिओ जॉकी’ म्हणून नव्या भूमिकेत काम करणार आहेत.
अमिताभ बच्चन यांचा ‘शमिताभ’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या जाहिरातीचा आणि प्रसिद्धीचा एक भाग म्हणून अमिताभ ‘रेड एफ.एम.’ या खासगी रेडिओ चॅनेलवर एक दिवस ‘रेडिओ जॉकी’ म्हणून काम करणार आहेत. अमिताभ यांचे चाहते आणि एफ.एम. रेडिओच्या श्रोत्यांसाठी गुरुवारचा हा दिवस विशेष पर्वणी असणार आहे.
कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये थेट संवाद घडवून आणण्याच्या दृष्टीने या एफ.एम. रेडिओ चॅनेलवर हा प्रयोग केला जाणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अमिताभ यांनी हा कार्यक्रम व सूत्रसंचालन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. सूत्रसंचालक किंवा निवेदकासाठी तो आदर्श वस्तुपाठ होता. त्यामुळे आता एफ. एम. रेडिओवरील अमिताभ यांचा ‘रेडिओ जॉकी’ही कसा असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘रेड एफ.एम.’च्या श्रोत्यांनी गुरुवारी या रेडिओवर दूरध्वनीवरून संपर्क केल्यानंतर दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन श्रोत्यांना ‘नमस्कार’ आणि ‘हॅलो’ करणार असून, श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते थेट उत्तरेही देणार आहेत. त्यामुळे गुरुवारी एका दिवसासाठी ‘रेड एफ.एम.’चे स्वरूप ‘ऑल इंडिया शमितभ रेडिओ’ असे होणार आहे.