बॉलीवूड ‘खान’दानातील शाहरुखच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाची सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. शाहरुख या चित्रपटात दोन वेगवेगळ्या ‘लूक’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील आपल्या वेगळ्या ‘लूक’ची छायाचित्रे स्वत: शाहरुखने नुकतीच सोशल मीडियावर झळकविली आहेत. ‘बनिया का दिमाग और मियाभाई का डेअरिंग’ असे वाक्य या पोस्टरवर पाहायला मिळते.
आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीबाबत हल्ली स्वत: कलाकार जागरूक असलेले दिसून येत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार ब्लॉग, फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साइटद्वारे सातत्याने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहात आहेत. या माध्यमाचा चांगला उपयोग करून ते स्वत:ची आणि आपल्या चित्रपटाचीही प्रसिद्धी करत आहेत. शाहरुखनेही आपल्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘ट्विटर’चा वापर केला आहे. शाहरुख यापूर्वी ‘डॉन’ आणि ‘डॉन-२’मध्ये ‘भाई’च्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. आगामी ‘रईस’मध्येही तो अशाच एका भाईच्या भूमिकेत आहे. पण ‘डॉन’ची ही भूमिका याअगोदरच्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचे शाहरुखचे म्हणणे आहे. शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटाचे पोस्टर ही जाहीर झाले असून यात शाहरुख ‘बनिया का दिमाग और मियाभाई की डेअरिंग’ असे वाक्य म्हणताना दाखविला आहे. ‘रईस’ चित्रपटाचा ट्रेलरही सध्या सोशल मीडियावर झळकत आहे. ‘रईस’चे पोस्टर आणि ट्रेलरच्या बाबतीत शाहरुखने ‘ट्विटर’वरून ‘केम छो, मजा आ रहा है, ये है रईस का पोस्टर, उम्मीद है आपको पसंत आएगा’ असे सांगत ‘जलेबी से तो मिठा मेरा हलवाई है’ असे ट्विट केले आहे. रोहित ढोलकिया दिग्दर्शित शाहरुखच्या ‘रईस’ची उत्सुकता शाहरुखने केलेल्या या ट्विटमुळे आणि पोस्टरबाजीमुळे वाढली आहे.

Story img Loader