एकेकाळी आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकणारे अभिनेते म्हणजे रघुबीर यादव. त्यांनी ‘रोमिओ अकबर वॉल्टर’, ‘पिकू’, ‘लगान’, ‘डरना मना है’, ‘न्यूटन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाच्या चर्चा आजही कायम आहेत. पण सध्या एका वेगळ्याच कारणाने ते चर्चेत आहेत. या चर्चा त्यांच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
३२ वर्षांपूर्वी रघुबीर यांनी पूर्णिमा खरगा यांच्याशी विवाह केला. रघुबीर यांचे विवाहबाह्य संबंध असून त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण न केल्याचा आरोप पूर्णिमा यांनी केला आहे. वांद्रे न्यायालयात पूर्णिमा यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. तसेच त्यांनी रघुबीर यांच्याकडे १० कोटी रुपये पोटगी म्हणून मागितले आहेत.
रघुबीर आणि पूर्णिमा यांची ओळख नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाली. सहा महिन्यांमध्येच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८८ साली ते विवाह बंधनात अडकले. त्यावेळी पूर्णिमा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कथ्थक नर्तिका होत्या. तर दुसरीकडे रघुबीर हे काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करत होते. रघुबीर यांना करिअरवर पूर्ण लक्ष देता यावे यासाठी पूर्णिमाने त्यांचे करिअर सोडले. आता त्यांना ३० वर्षांचा मुलगा आहे. पण चित्रपटसृष्टीमधील एक यशस्वी अभिनेता झाल्यावर रघुबीर यांनी १९९५ साली पत्नी आणि मुलाला सोडून दिले.
त्याचवेळी रघुबीर यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पूर्णिमा यांना आला. पण त्यांनी त्यांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर रघुबीर यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. मात्र काही महिन्यांमध्ये त्यांनीच तो परत घेतला.