बदलत्या काळानुसार संगीताच्या अभिरुचीतही बदल होत गेले आणि त्याचा थेट परिणाम अभिजात संगीतावर झाल्याचे दिसते. ‘राग्या’ या एका उपयोजनामुळे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिकांना जी एक उत्तम संधी मिळाली आहे, ती केवळ उत्कंठा वाढवणारी नाही, तर रसिकांच्या रसिकतेला साद घालणारी आहे. भारतीय संगीतात रागसमय या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कोणताही राग कोणत्याही वेळेला गाणे आणि ऐकणे, याला संमती नसते. ‘राग्या’मुळे ही एक अतिशय उत्तम सोय झाली आहे. अनेक नव्या कलावंतांना आपले गायन श्रोत्यांसमोर सादर करण्याची इच्छा असते. ती या उपयोजनामुळे सहजसाध्य झाली आहे. ‘राग्या’ हे उपयोजन (ॲप) आपल्या मोबाइलवरही उपलब्ध होऊ शकते. ते विनामूल्यही उपलब्ध होऊ शकते आणि काही पैसे भरून तेथे उपलब्ध असलेले सुमारे दोन हजार कार्यक्रमही ऐकता येऊ शकतात. ‘राग्या’ ही कल्पना सुचली याचे कारण नव्या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या अनेक मंचावर संगीत मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असले, तरी नेमके ऐकण्यासाठी खूप शोधाशोध करावी लागते. त्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि उत्तम दर्जाच्या ध्वनिमुद्रण तंत्राच्या आधारे उत्तम संगीत सहजपणे ऐकण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी असे काही करता येण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच चैतन्य नाडकर्णी, आदित्य दीपांकर आणि संयुक्ता शास्त्री या तिघांनी ‘राग्या’ची संकल्पना सिद्धीस नेण्याचे ठरवले. रसिकांची गरज ओळखून संगीत ऐकवत असतानाच, नव्या कलावंतांचा शोध घेणे, ध्वनिमुद्रण मिळवणे, यासाठीचा सगळा खटाटोप हे तिघेहीजण अतिशय आनंदाने करतात.

‘अनेक प्रथितयश कलावंतही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत रसिकांसमोर येत नाहीत. त्याहीपेक्षा अनेक कलावंत परदेशात राहूनही भारतीय अभिजात संगीताची आराधना करीत राहतात. त्यांना ‘राग्या’ या मंचावर आणणे हे आम्ही आमचे ध्येय ठेवले’, असे चैतन्य नाडकर्णी यांनी सांगितले. गेली तीन वर्षे, विशेषत: करोनाकाळात ‘राग्या’ने अनेक रसिकांना जगण्याचे बळ दिले. नवे उत्तम संगीत ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली आणि त्यामुळे अनेक नवे कलाकारही या उपयोजनामुळे प्रकाशात आले. ‘राग्या’ हे उपयोजन सुरू करताच, त्या वेळचा राग सादर होतो. त्यामुळे रागसंगीतातील रागसमय ही कल्पनाही हळूहळू लक्षात येऊ लागते. विशिष्ट कलाकाराचेच गायन ऐकण्याचीही सोय या उपयोजनात आहे. त्यामुळे रसिकाला आपल्या आवडत्या कलावंताचा आवडता राग ऐकता येतो. आपण प्रवासात असतो, कधी काम करता करताही आपल्याला संगीत ऐकावेसे वाटते, अशा वेळी हाती असलेल्या मोबाइलसारख्या उपकरणाद्वारे आपण हे संगीत ऐकू शकतो. त्यामुळेच ‘राग्या’ने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. शेकडो वर्षांच्या या परंपरेला घरघर तर लागली नाही ना, अशा चिंताजनक वातावरणातही अनेक तरुण आपले सारे आयुष्य केवळ अभिजात संगीतासाठी समर्पित करण्याची तयारी दाखवत असतील, तर त्यांच्यासाठी काही करणे हे आपलेही कर्तव्य ठरते, या भावनेतून सुरू केलेल्या या उपयोजनाचे महत्त्व संगीत टिकवून ठेवण्यासाठी अधिक आहे. त्यामुळेच ‘राग्या’ला प्रत्येक रसिकाने भरभरून प्रतिसाद द्यायला हवा.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

भारतीय अभिजात संगीत ही येथील संस्कृतीची आद्य खूण आहे. सातत्याने बदलत असलेल्या आणि प्रवाही असलेल्या अभिजात संगीताची ही खूण अधिक ठळक करण्यासाठी सुरू झालेल्या या प्रयत्नांना रसिक साद देत आहेत, हे सुचिन्ह असले, तरी त्यासाठी अधिक निगुतीने प्रयत्न करायला हवेत, हेही खरे.

Story img Loader