कल खेलमें हम हो ना हो
गर्दिश में तारे रहेंगे सदा..
भुलोगे तुम, भुलेंगे वो..
पर हम तुम्हारे रहेंगे सदा…

100 Years of Raj Kapoor : राज कपूर यांचं आयुष्यही असंच होतं हेच म्हणता येईल. कारण सिनेमा हा त्यांचा श्वास होता. राज कपूर यांच्या जयंतीचं हे शताब्दी वर्ष. या शताब्दी वर्षानिमित्त नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण कपूर कुटुंबाची भेट घेतली. राज कपूर यांनी त्यांचे वडील पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून सुरु झालेला चित्रपटांचा वारसा पुढे चालवला. आता कपूर घराण्यातली चौथी पिढीही बॉलिवूडमध्ये आपलं स्थान टिकवून आहे. राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांना ‘द ग्रेटेस्ट शो मन’ असं म्हटलं जातं ते उगाच नाही. नॅशनल फिल्म म्युझियम मुंबई या ठिकाणी त्यांचा असलेला पुतळा या गोष्टीची ग्वाही देत उभा आहे आणि पुढील वर्षानुवर्षे तो पुतळाही वारसा सांगत राहिल.

स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
ram kapoor
श्रीमंत वडिलांनी पैसे पाठवणं बंद केलं अन्…; प्रसिद्ध अभिनेता संघर्षाचे दिवस आठवत म्हणाला, “सेकंड हॅण्ड…”
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
Ram Teri Ganga Maili
‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटासाठी मंदाकिनी नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीला घेणार होते राज कपूर, पण….; अभिनेत्री ४० वर्षांनी खुलासा करत म्हणाली…
100 Years Of Raj Kapoor
राज कपूर यांचा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील पुतळा (फोटो-समीर जावळे)

कपूर घराण्याची मूळं हिंदी चित्रपटसृष्टीत घट्ट रोवलेली

१९२९ च्या सुमारास पृथ्वीराज कपूर हे त्यांच्या कुटुंबासह पेशावरहून मुंबईत आले. त्यावेळी राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) अवघ्या पाच वर्षांचे होते. आता राज कपूर यांच्या घराण्यातली चौथी पिढी म्हणजेच रणबीर कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर हेदेखील सिनेसृष्टीत त्यांचं नाव कमावून प्रसिद्धीच्या शिखरावर गेले आहेत. राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांची आठवण झाली नाही असा एकही फेस्टिव्हल साजरा होत नाही. राज कपूर यांची कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळ होती. अभिनेता म्हणून संपूर्ण स्क्रिन व्यापून टाकणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. वडिलांकडून आलेले दिग्दर्शनाचे आणि अभिनयाचे गुण त्यांनी फक्त आत्मसात केले नव्हते तर त्यांच्यातला नायक हा सिनेमांमध्ये उठून दिसत असे. एखाद्या व्यक्तिमत्वाची छाप पडते अगदी तसंच व्यक्तिमत्व राज कपूर यांचं होतं यात शंकाच नाही.

100 Years Of Raj Kapoor
अभिनेते राज कपूर आपल्या खास स्टाईलमध्ये (राज कपूर, इन्स्टाग्राम पेज)

वयाच्या ११ व्या वर्षापासून राज कपूर भूमिका करु लागले

वयाच्या ११ व्या वर्षापासून राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) हे भूमिका करु लागले. देवकी बोस यांच्या ‘वाल्मिकी’ नावाच्या सिनेमात राज कपूर यांनी वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासह भूमिका साकारली. त्यानंतर पाच इतर चित्रपटांमध्येही राज कपूर यांनी बाल कलाकार म्हणून भूमिका साकारल्या. यानंतर त्यांचा चर्चेतला चित्रपट राहिला तो म्हणजे ‘नीलकमल’. या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शर्मा यांन केलं होतं. तर मधुबाला राज कपूर यांची नायिका होती. वयाच्या २२ व्या वर्षी राज कपूर यांनी ‘आग’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. आर. के. स्टुडिओची निर्मिती असलेला तो पहिला चित्रपट होता. चित्रपट बनवायचे असतील तर आपल्याकडे निर्मिती संस्था हवी या विचारांतून आणि दूरदृष्टीतून आर. के. स्टुडिओजची स्थापना करण्यात आली. सिनेमा तयार करण्यासाठी अभिनयांतून पैसे कमवायचे असा राज कपूर यांचा नियम होता.

हिंदी सिनेसृष्टीतली पहिली त्रिमूर्ती

हिंदी चित्रपट जेव्हा ‘कृष्णधवल’ म्हणजेच ‘ब्लॅक अँड व्हाईट’ होते त्या काळात एका त्रिमुर्तीची सिनेसृष्टीवर छाप होती. ते तीन नायक होते दिलीप कुमार, देवानंद आणि राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) . दिलीप कुमार, देवानंद आणि राज कपूर ही हिंदी चित्रपट सृष्टीतली पहिली त्रिमुर्ती मानली जाते ज्यांचे चित्रपट कायमच चर्चेत असत. व्ही. शांताराम, सोहराम मोदी, मेहबुब, बिमल रॉय, गुरुदत्त या कलाकरांची चित्रपट तयार करण्याची एक शैली होती. या शैलीपेक्षा आपला चित्रपट वेगळा कसा असेल यावर राज कपूर यांनी भर दिला. राज कपूर यांची शैली कशी बदलली ? याचं उत्तर हवं असेल तर ते सापडतं १९५१-१९५२ च्या आसपास झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये.

100 Years Of Raj Kapoor
हिंदी सिनेसृष्टीतील पहिली त्रिमुर्ती दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

‘द बायसिकल थीफ’ राज कपूर यांनी पाहिला आणि…

‘द बायसिकल थीफ’ नावाचा सिनेमा राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) आणि सत्यजीत रे यांनी कोलकाता या ठिकाणी झालेल्या जागतिक चित्रपट महोत्सवात पाहिला. त्याचा गहिरा परिणाम दोघांच्याही चित्रपट शैलीवर दिसून आला. सत्यजीत रे यांनी त्यावरुन ‘पथेर पांचाली’ हा सिनेमा तयार केला. सिनेमा जगतातील मैलाचा दगड असं या सिनेमाचं वर्णन आजही केलं जातं. हा सिनेमा त्याची ट्रायालॉजी हा प्रकार सिनेमा अभ्यास करणारे रसिक प्रेक्षक आणि विद्यार्थी आजही अभ्यासताना दिसता. ‘द बायसिकल थीफ’ पाहून राज कपूरना ‘जागते रहो’ सिनेमा सुचला. कणभर विषय आणि मणभर आशय असं सूत्रं घेऊन राज कपूर यांनी चित्रपट तयार केले. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती चित्रपट फिरवणं तो यशस्वी करुन दाखवणं या शैलीत राज कपूर यांची वेगळी हातोटी होती. ‘जोकर’ या विषयावर कुठला सिनेमा येईल असं हिंदी सिनेसृष्टीत कधीही कुणाला वाटलं नव्हतं. राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) पाच वर्षे ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा समीक्षकांनी तो नाकारला. त्यानंतर माऊथ पब्लिसिटीमुळेही हा सिनेमा पडला. यामध्ये राज कपूर यांचा स्टुडिओ, घर असं सगळं पणाला लागलं होतं. मात्र काहीही उपयोग झाला नाही. राज कपूर अक्षरशः कंगालच झाले होते. मात्र नंतर त्यांनी हिंमत न हरता तरुणाईला साद घालत ‘बॉबी’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. हा चित्रपट इतका चालला की राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांची कंगाली तर संपलीच पण एक शोमन काय करु शकतो, राखेतून पुन्हा कसा उभा राहू शकतो हे राज कपूर यांनी दाखवून दिलं. तरीही तो जोकर त्यांच्या आयुष्यात घर करुन राहिला.

मेरा नाम जोकर हा त्यांच्या हृदयाजवळचा सिनेमा

हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वात मानाचा समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके’ हा पुरस्कार १९८८ मध्ये राज कपूर यांना जाहीर झाला तेव्हा त्यांनी ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील ‘जीना यहाँ मरना यहाँ’च्या ओळी म्हणून दाखवल्या होत्या. तसंच या पुरस्काराबाबत खूप धन्यता वाटते असंही राज कपूर यांनी म्हटलं होतं. राज कपूर म्हणाले होते की, “पृथ्वीराज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा मरणोत्तर जाहीर झाला होता, तो पुरस्कार घ्यायला त्यांचा मुलगा म्हणून मी गेलो होतो. मात्र तो पुरस्कार मलाही मिळेल याची कल्पना नव्हती. मी फक्त निमित्त आहे, माझ्या टीममुळे मला हा इतका मोठा पुरस्कार मिळतो आहे. राज कपूरचा जितका या पुरस्कारात वाटा आहे तेवढाच मला साथ दिलेल्या प्रत्येक माणसाचा या पुरस्कारात वाटा आहे.” असं राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत म्हणाले होते.

100 Years of Raj Kapoor
मेरा नाम जोकर या सिनेमाच्या निर्मितीला राज कपूर यांना पाच वर्षे लागली होती. (फोटो सौजन्य, फेसबुक पेज राज कपूर)

राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी सुपरहिट

राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) आणि नर्गिस यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली होती. या दोघांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. ‘श्री ४२०’, ‘आग’, ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘आह’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ असे एकाहून एक सरस चित्रपट या जोडीने दिले. ‘प्यार हुआ इकरार हुआ है..’ हे त्यांनी एका छत्रीखाली म्हटलेलं गाणं, त्यातली मुंबई ही अनेक प्रेमी युगुलांना छत्रीतलं आणि पावसातलं प्रेम शिकवून गेली. रील लाइफमध्ये एकत्र दिसणाऱ्या नर्गिस यांच्याशी राज कपूर यांचे व्यक्तिगत आयुष्यातही भावबंध जुळले होते. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात नऊ वर्षे होते. नर्गिस आणि राज कपूर यांना लग्न करायचं होतं पण तसं घडलं नाही. राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांचा विवाह आधीच कृष्णा कपूर यांच्याशी झाला होता. मधु जैन लिखित ‘द कपूर्स’ या पुस्तकात हा सगळा उल्लेख आहे. राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमसंबंधाबाबत जेव्हा पृथ्वीराज कपूर यांना कळलं तेव्हा ते चांगलेच चिडले होते. त्यांनी या दोघांच्या नात्याला कडाडून विरोध केला. त्यामुळे हे नातं संपुष्टात आलं.

राज कपूर यांचं नर्गिस यांच्यावर होतं प्रेम

मधु जैन यांच्या ‘द कपूर्स: द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा’ या पुस्तकातील माहितीनुसार ब्रेकअपनंतर राज कपूर पत्रकार सुरेश कोहलीला म्हणाले होते, “अख्खं जग म्हणतंय की मी नर्गिसला दुखावलं. पण खरं तर तिनेच माझा विश्वासघात केला.” पुस्तकातील माहितीनुसार, “नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केलंय हे कळाल्यावर राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांना धक्का बसला आणि ते मित्र आणि सहकाऱ्यांसमोर खूप रडले. राज कपूर यांना ते सहनच झालं नव्हतं. नर्गिसचं लग्न झालंय हे आपण स्वप्न तर पाहत नाही ना यासाठी त्यांनी स्वतःला सिगारेटचे चटके दिले होते. नर्गिस असं करू शकते, यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता,” असं पुस्तकात लिहिलं आहे.

100 Years of Raj Kapoor
राज कपूर आणि नर्गिस यांची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री उत्तम होती यात शंकाच नाही. (फोटो-इन्स्टाग्राम पेज, राज कपूर)

राज कपूर यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव

राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता. राज कपूर एका मुलाखतीत म्हणाले होते की “मी लहान असल्यापासूनच चार्ली चॅप्लिन यांचे चित्रपट बघत असे. लोक त्यांच्या फोटोंकडे पाहून, पोस्टर्स पाहून हसायचे, त्यांना गंमत वाटे. मी मात्र एकटक बघत रहायचो आणि माझे डोळे माझ्याही नकळत भरुन यायचे. मला असं वाटतं की कुठेतरी माझ्यामध्ये त्यांचा प्रभाव मी नट झाल्यावरही आपसूकच राहिला. त्यामुळे लोकांना माझी शैली ‘चार्ली चॅप्लिन’सारखी वाटली असेल. चार्ली चॅप्लिन यांनी कायमच असा एक माणूस पडद्यावर जिवंत केला ज्याला आगापिछा नव्हता. तो कुठून आला आहे? कुठे जाणार आहे? हे माहीत नसायचं. तरीही तो लोकांचं मनोरंजन करायचा. मला त्यांच्यात माझ्यात हे साधर्म्य जाणवलं. ‘आवारा’तलं गाणं होतं की “घर-दार नही, संसार नहीं मुझसे किसी को प्यार नहीं..” मला या ओळी माझ्यासाठी आणि चार्ली चॅप्लिन यांच्यासाठी लिहिल्या आहेत असंच वाटे. सामान्य, गरीब माणसाच्या व्यथा चार्ली चॅप्लिन यांनी मांडल्या होत्या. माझ्यावर त्यामुळेच त्यांचा प्रभाव पडला असं राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांनी सांगितलं होतं. आपल्यावरच हसून लोकांचं रंजन करणाऱ्या राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांचं सिनेसृष्टीतलं योगदान हे खूप मोठं आहे.

100 Years of Raj Kapoor
राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांमधून विविध प्रकारचे विषय हाताळले होते. (फोटो-राज कपूर इन्स्टाग्राम पेज)

राज कपूर यांचे गाजलेले काही किस्से

राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांच्याबाबत एक किस्सा कायम सांगितला जातो की पंडित नेहरु जेव्हा रशियाला गेले होते तेव्हा तिथे त्यांचं संबोधन पार पडलं. त्यानंतर रशियाचे तेव्हाचे पंतप्रधान निकोलाई बल्गनन बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी भाषणाची सुरुवातच आवारा हूँ या ओळींनी केली त्यामुळे पंडित नेहरुही चकीत झाले. १९९६ मध्ये राज कपूर यांचे पुत्र रणधीर कपूर आणि मुलगी रितू नंदा चीनला गेले तेव्हा त्यावेळी त्यांना पाहून तिथले लोक आवारा हूँ हे गाणं म्हणू लागले. हे गाणं म्हणून त्यांनी राज कपूर आणि भारताचा सन्मान करत होते असं त्यांनी सांगितलं. राज कपूर हे रशिया, तुर्कस्तान, चीन अशा देशांमध्येही प्रसिद्ध होते. या देशांमध्ये त्यांचा एक मोठा चाहता वर्ग होता. याबाबत बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) म्हणाले होते, “१९५४ मध्ये आम्ही रशियाला गेलो होतो. त्यात मी ‘आवारा’चं पोस्टर घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांना ‘आवारा’ सिनेमा ठाऊक होता. ‘आवारा’ हा सिनेमा त्यांनी पाहिला आणि त्यांना तो सिनेमा त्यांना आवडला. कारण त्यांना सगळ्यांना ‘खुशी के गीत’ गाणारा तरुण आवडला होता.” असं राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांनी सांगितलं होतं.

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल’ व्हिस्कीशी खास नातं

‘जॉनी वॉकर ब्लॅक लेबल’ या व्हिस्कीशी त्यांचं खास नातं होतं. लंडनहून आणलेली व्हिस्कीची बाटली कायमच राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांच्याजवळ असे. मधू जैन यांच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. राज कपूर ब्लॅक लेबल व्हिस्की बड्या पार्ट्यांमध्येही घेऊन जायचे. लंडनहून ती बाटली आणायचे, ते स्वतः प्यायचे किंवा त्यांच्या अगदी खास लोकांना त्यातला एखादा पेग ऑफर करायचे. इतर मित्रांना दुबई किंवा भारतातली जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ऑफर करायचे.

खऱ्याखुऱ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांचा वापर चित्रपटात अत्यंत खुबीने करायचे राज कपूर

राज कपूर त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांचा वापर त्यांच्या चित्रपटांमध्ये मोठ्या खुबीने करायचे. त्यांच्या मुलीनेच याबाबत आठवण सांगितली होती “एकदा राज कपूर आणि नर्गिस या दोघांना पार्टीला जायचं होतं. त्यावेळी नर्गिस घरी आल्या. त्यांच्या हातात एक चिठ्ठी होती. मात्र राज कपूर यांना ती चिठ्ठी दाखवण्याआधी त्यांनी ती चिठ्ठी म्हणजे काहीही नाही असं म्हणत फाडून टाकली. राज कपूर नर्गिसना विचारत राहिले की त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं? त्यावर नर्गिस म्हणाल्या काही कामाचं नव्हतं म्हणून तो कागद फाडून टाकला. राज कपूर आणि नर्गिस पार्टीला जाण्यासाठी कारजवळ पोहचले तेव्हा राज कपूर म्हणाले मी माझा रुमाल विसरलो आहे. ते रुमाल आणायला आत गेले तेव्हा त्यांनी ते तुकडे जपून ठेवले. दुसऱ्या दिवशी ते नीट जोडून पाहिले तेव्हा त्यांना कळलं की एका निर्मात्याने नर्गिस यांना प्रपोज केलं आहे आणि लग्नाबाबत विचारलं आहे. हा संपूर्ण प्रसंग राज कपूर यांनी ‘संगम’ सिनेमात जसाच्या तसा वापरला होता.”

100 Years of Raj Kapoor
राज कपूर आणि वैजयंती माला यांचा संगम हा सिनेमाही लोकांनी डोक्यावर घेतला होता. (फोटो सौजन्य-राज कपूर, इन्स्टाग्राम पेज)

संगीत या विषयाची जाण असलेला कलाकार

राज कपूर ( 100 Years of Raj Kapoor ) यांना संगीत या विषयाची जबरदस्त जाण होती. अनेक वाद्यंही ते वाजवत असत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांमधली गाणी ही त्यांच्या चित्रपटातली सर्वात मोठी जमेची बाजू असे. सिनेमा गाण्यांमुळे कसा स्मरणात राहतो हे जाणून घ्यायचं असेल तर राज कपूर यांच्या कुठल्याही सिनेमातली गाणी आठवा ती आजही सहज आपल्या ओठांवर गुणगुणता येतात. ‘संगम’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’ या चित्रपटांपासून ते अगदी ‘बॉबी’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’ अशी कितीतरी मोठी यादी करता येईल. मुकेशचं गाणं म्हणणं आणि राज कपूर यांना त्यांनी दिलेला आवाज हे समीकरणही अगदी चपखल बसलं होतं. १९७६ मध्ये मुकेश यांचं निधन झालं तेव्हा राज कपूर म्हणाले होते माझा ‘आवाज’ निघून गेला.

100 Years of Raj Kapoor
राज कपूर हे त्यांच्या दिलखुलास स्वभावासाठीही प्रसिद्ध होते. (फोटो-राज कपूर, इन्स्टाग्राम पेज)

कलंदर आयुष्य जगणारा अवलिया

राज कपूर म्हणजे कलंदर आयुष्य जगणारा अवलिया माणूस होता. त्यांनी सिनेमा सृष्टीला दिलेलं योगदान हे सिनेमासृष्टी कधीही विसरणार नाही. त्यांची अभिनयाची आपलीशी शैली, निळ्या डोळ्यांनी बोलणं, चार्ली चॅप्लिनसारखा अभिनय, आनंद वाटणं आणि मनातली सल मनात ठेवणं हे त्यांना अगदी लिलया जमलं. आज राज कपूर असते तर १०० वर्षांचे झाले असते. आज ते आपल्यात नाहीत. पण राज कपूर हे त्यांच्या चित्रपटांमुळे, त्यांच्या अभिनयामुळे, त्यांच्या गाण्यांमुळे, त्यांच्या शैलीमुळे फक्त अजरामर झाले आहेत, यात शंका नाही.

Story img Loader