दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव यांच्यासाहित संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासहित उपस्थित होते. नवाजुद्दीन बाळासाहेबांची भूमिका साकारत असल्याने सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर आज चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या थाटामाटात रिलीज करण्यात आला.

ट्रेलरमध्ये दिसत असल्याप्रमाणे चित्रपटात बाळासाहेबांचं संपूर्ण आयुष्य उलगडलं जाणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ते बाबरी मशीद पाडल्यानंर उसळलेली दंगल सर्व काही दाखवण्यात येणार आहे. नवाजुद्दीन बाळासाहेबांची भूमिका निभावत असून अमृता राव बाळासाहेबांच्या पत्नी मिनाताई ठाकरे यांची भूमिका निभावणार आहे.

यासोबतच ट्रेलरमध्ये मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, जावेद मियाँदाद यांच्या व्यक्तिरेखा दिसत असून त्यांची झलक पहायला मिळत आहे. यामधील एक चेहरा राज ठाकरेंचाही आहे. चित्रपटात राज ठाकरे यांनाही स्थान देण्यात आलं असून एका सीनमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची व्यक्तिरेखा दिसत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांची उत्सुकता वाढली आहे.

खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader