Raj Thackeray on Marathi Cinema: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलसाठी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राजकारणापासून ते विविध विषयासंदर्भात त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त केली. मराठी भाषेची गळचेपी, तसेच मराठी चित्रपटांना सिनेमाघर मिळत नसल्याच्या विषयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर येणार का? याबाबतही त्यांनी मनमोकळी प्रतिक्रिया दिली.

यावेळी महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटाविषयी प्रश्न विचारला. “ते म्हणाले, “चित्रपट मराठी सिनेमा मराठी माणसाने आणला. मराठी माणसाने चित्रपटसृष्टी मोठी केली. व्ही. शांताराम त्या काळात हिंदी, मराठी दोन भाषात चित्रपट तयार करायचे. आज मराठी सिनेमाची वाईट आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मराठी सिनेमे एकेकाळी व्हायचे, असे म्हणायची परिस्थिती येऊ शकते”, अशी खंत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात जेवढी हिंदी भाषा बोलली जाते, तेवढी कुठेच बोलली जात नसेल. यासाठी काय करता येईल? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना विचारला.

मराठी चित्रपटांनी कात टाकणं आवश्यक

महेश मांजरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना राज ठाकरे म्हणाले, “मुळात मराठी माणसाने तुमचे चित्रपट पाहायला का यावं? मराठी चित्रपट प्रेक्षकांना वेगळं काय देतात? आता ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि हिंदीत वेगळे चित्रपट येत आहेत. मराठी चित्रपटाच्या कथानकांनी आजूबाजूचं वातावरण पाहून कात टाकणं आवश्यक आहे.”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मराठी चित्रपटांना सिनेमागृह मिळत नव्हतं तेव्हा मनसेनं आंदोलन करून सिनेमागृह मिळवून दिलं. तेव्हा मी म्हणालो होतो की, मराठी चित्रपटांसाठी मी सिनेमागृह मिळवून देऊ शकतो, पण प्रेक्षक मिळवून देऊ शकत नाही. प्रेक्षक तुम्हाला आणावे लागतील. मराठी चित्रपटाला प्रेक्षक जात नाही असं नाही. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे. मध्यंतरी आलेला ‘बाई पण भारी देवा’, चित्रपट जोरात चालला. टेलिव्हिजन सोडून वेगळ्या प्रकारचे काही दाखवणार असाल तर प्रेक्षक नक्कीच चित्रपट पाहायला येतील.

लोकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली असे म्हटले जाते. पण चित्रपटातही चागंल्या प्रकारचा आशय असायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले.