हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार सुपरस्टार आहेत. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत एकही सुपरस्टार झालेला नाही. यावर नेहमीच बोललं जातं, चर्चा केली जाते. हाच धागा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी नाट्य, आणि चित्रपटसृष्टीमधील कलाकारांची कानउघडणी केली. पिंपरी येथे चालू असलेल्या १०० व्या नाट्यसंमेलनावेळी दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांच्या एकमेकांशी वागण्या-बोलण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, जगाला हेवा वाटेल असा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. परंतु, मराठी माणूस या सगळ्या गोष्टी गमावून बसला आहे. सगळं काही आपल्या हातून सुटत चाललं आहे. आपण जातीपातींमध्ये भांडत बसलो आहोत. चित्रपट आणि नाट्यसृष्टीतही तेच घडतंय. मला नाट्य क्षेत्रातल्या लोकांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही कृपया वाईट वाटून घेऊ नका. मी जेव्हा बाहेरच्या राज्यातले कलावंत पाहतो, बाहेरच्या राज्यातल्या कलावंतांना जेव्हा भेटतो आणि मी जेव्हा आपल्या कलावंतांना भेटतो तेव्हा मला काही चुका दिसतात. त्या चुका मांडणं आवश्यक आहे. या चुका सांगण्यासाठी, मांडण्यासाठी मी मराठी कलावंतांची एक बैठक किंवा एक शिबीर बोलावणार होतो. परंतु, आज १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त सर्व कलावंत इथे असतील हा विचार करून इथेच बोलतो. जे आज इथे नसतील त्यांनीही कृपा करून हे ऐका.

मनसे अध्यक्ष म्हणाले, तुम्ही मराठी कलावंत एकमेकांना जर मान-सन्मान दिला नाही, तुम्ही एकमेकांना लोकांसमोर, मंचावर आणि इतर ठिकाणी आद्या, पद्या, शेळ्या, मेंढ्या अशा हाका मारत राहिलात, पुष्प्या आलाय…आंड्या आलाय… असं तुम्ही भर मंचावर आणि शेकडो लोकांसमोर बोलता, ही सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळेच आज मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार नाही. मराठीत कलावंत आहेत, पण स्टार नाही.

राज ठाकरे कलावंतांना उद्देशून म्हणाले, बाकीच्या चित्रपटसृष्टीकडे असे अनेक सुपरस्टार आहेत. तुम्ही कुठल्याही भाषेत पाहा, तमिळ, तेलुगू, मल्याळम अशा प्रत्येक भाषेत स्टार्स आहेत. परंतु, महाराष्ट्रात नाहीत. महाराष्ट्रात पूर्वी स्टार्स होते. आजही आपल्याकडे सगळे गुण असलेले कलाकार आहेत. परंतु, आपणच एकमेकांना टीव्हीवरील कार्यक्रमात, मंचावर, लोकांसमोर नावाचा अपभ्रंश करून हाका मारतो, एकप्रकारचा अपमान करतो. काही कलाकार तर एकमेकांना वाट्टेल ते बोलतात. तुम्हीच जर तुमचा मान राखला नाहीत तर लोक तुम्हाला मान देतील का?

हे ही वाचा >> “तू कारवाई कर, तेव्हा…”, एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचं अजित पवारांना आव्हान

…तर तुम्हाला लोकांकडून मान मिळणार नाही : राज ठाकरे

राज ठाकरे यांनी यावेळी सुपरस्टार रजनीकांत यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, मी अनेक ठिकाणी पाहिलं आहे की रजनीकांत आणि इलैय्याराजा (दिग्गज संगीतकार) रात्री एकत्र बसून मद्यप्राशन करत असतील. परंतु, मंचावर आल्यावर ते दोघे एकमेकांना सर म्हणून हाक मारतात. एकमेकांशी कितीही घनिष्ट संबंध असले ती मंचावर आणि लोकांसमोर एकमेकांना आदराने हाक मारतात. दक्षिणेकडच्या अभिनेत्री आणि अभिनेते एकमेकांशी कितीही चांगले संबंध असले तरी ते चार भिंतीत ठेवतात. परंतु, बाहेर आल्यावर एकमेकांना मान दिला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की, मराठी कलावंतांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही एकमेकांना लोकांसमोर मान दिला तर लोकांकडून तुम्हाला मान मिळेल, अन्यथा लोकांकडून तुम्हाला मान मिळणार नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray says marathi actors dont give respect each other there we dont have superstars asc