एसएस राजामौली हे भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक आहेत. याची दखल बाहेरच्या देशांनीही घेतली आहे. यंदा राजामौली यांच्या ‘आरआरआर’चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. एवढंच नाही तर जगभरात राजामौली यांच्या या चित्रपटाची दखल घेतली. राजामौली यांच्यासारखा दिग्दर्शकाने प्राचीन भारतीय संस्कृतीवर एखादा चित्रपट काढावा अशी सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत होती.
अशाच विषयावर एक चित्रपट राजामौली यांना बनवायचा होता याबद्दल नुकतंच त्यांनी एका ट्विटर युझरला उत्तर देताना खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर यासाठी राजामौली यांना पाकिस्तानात जाऊन संशोधन करायचं होतं, पण पाकिस्तानकडून यासाठी परवानगी न मिळाल्याने हे प्रोजेक्ट बारगळलं असं त्यांनी नुकतंच सोशल मीडियावर स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : चेहऱ्यावर रुतलेले ६७ काचेचे तुकडे; ‘त्या’ भयानक अपघातानंतर महिमा चौधरीची ‘अशी’ होती अवस्था
नुकतंच आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्वीटमध्ये प्राचीन सिंधू संस्कृतीविषयी काही चित्रं आणि माहिती होती. या ट्वीटमध्ये आनंद यांइ राजामौली यांना टॅग केलं आणि लिहिलं, “तुम्हाला या प्राचीन संस्कृतीवर एक चित्रपट बनवायला हवा, ज्यामुळे या प्राचीन सभ्यतेविषयी आपल्या लोकांना माहिती मिळेल.”
या ट्वीटला उत्तर देताना राजामौली म्हणाले, “नक्कीच सर. ‘मगधिरा’च्या चित्रीकरणादरम्यान गुजरातच्या धोलावीरा परिसरात मला एक झाड दिसलं होतं, जे खूप प्राचीन होतं आणि खूप जुनंदेखील होतं. त्यावेळी मी सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवायचा विचार केला होता. काही वर्षांनी मी पाकिस्तानमध्येही गेलो, मोहेंजो दारोला जाऊन भेट द्यायचा खूप प्रयत्न केला, पण त्यावेळी मला परवानगी मिळाली नाही.”
मोहेंजो दारो ही एक ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ आहे जी पाकिस्तानातील सिंधू नदीच्या किनारी आहे. तिथे सिंधु संस्कृतीचे काही अवशेष आहेत. गेल्या काही काळात पाकिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे इथला बराच भाग खचला असल्याने या परिसरात प्रवाशांना येण्यास बंदी घालण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.