लेखक राजन खान यांना आपल्या अवतीभवतीची माणसं, त्यांचं जगणं, मानवी नातेसंबंध, परिस्थितीवश त्यांत निर्माण होणारे पेच, स्त्री-पुरुष संबंधांतली गूढता यांचा वेध घेण्यात रस दिसतो. त्यामुळे विपुल लिहूनही त्यांच्या लेखनात नित्य काही नवं सापडतं. वर्तमानाशी सतत आपला सांधा जुळलेला राहील याची दक्षता ते घेतात. ‘लेखक हिंडता बरा’ या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच त्यांच्या पायाला सतत भिंगरी लागलेली असते. या निरुद्देश (बऱ्याचदा सहेतुकही!) भ्रमंतीत त्यांना नवनवी माणसं भेटतात. त्यांचे ‘नमुने’ जवळून न्याहाळायला मिळतात. त्यांच्याबरोबरच्या संभाषणांतून त्यांचं जगणं समजून घेण्याचं कुतूहल त्यांच्यात असतंच. साहजिकच काही ना काही संचित त्यांच्या झोळीत पडतंच. ज्याचा वापर ते लेखनातलं मूलद्रव्य म्हणून करतात. अर्थातच त्यामुळे ते लेखक म्हणून ताजेतवानेही राहतात. लेखक म्हणून त्यांची स्वत:ची एक भूमिकाही असतेच. या सगळ्याच्या घुसळणीतून त्यांचं लेखन प्रसवत असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांची ‘ग्वाही’ ही कथा मानवी संबंधांतील रहस्य उलगडून दाखवणारी आहे. या कथेवर आधारित त्याच नावाचं नाटक मैत्रेय थिएटरने सादर केलं आहे. आरोपी, फिर्यादी आणि साक्षीदार अशा सर्व भूमिकांत एकच व्यक्ती जर न्यायालयासमोर आली तर निवाडा करणं न्यायाधीशांनाही कसं अवघड होतं, हे सांगणारी ही कथा.

एक पोस्टमन विनायक मदाने या गृहस्थांविरुद्ध पोलिसात फिर्याद करतो की, त्यांच्या घरी पत्र टाकण्यासाठी गेलेलो असताना त्यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला. तर विनायक मदाने यांनीसुद्धा पोलिसात तक्रार नोंदवलेली असते, की पोस्टमनने त्यांच्या पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, म्हणून रागाच्या भरात आपण त्याला ढकललं. पण त्या झटापटीत तो पाटय़ावर पडल्याने त्याला मार लागला.

साहजिकच कोर्टात खटला उभा राहिला. विनायक मदाने आणि पोस्टमन यांनी परस्परांविरुद्ध आरोप केलेले असल्याने जिच्यावरून ही घटना घडली त्या मदानेंच्या पत्नीची- मंगलाची साक्ष काढली जाते. ती प्रत्यक्ष घडलेली घटना सविस्तरपणे कथन करते. त्यात तिचं म्हणणं असं, की तिच्या पतीने पोस्टमनला जीवे मारण्याचा वगैरे प्रयत्न केला, हा त्याचा आरोप साफ खोटा आहे. त्यांनी फक्त पोस्टमनला ढकललं. पण तो पडल्यामुळे त्याला लागलं, इतकंच. आपले पतीराज हे अत्यंत शांत स्वभावाचे, कुणाच्या अध्यातमध्यात नसलेले सद्गृहस्थ आहेत. राहता राहिला प्रश्न विनयभंगाचा. तर.. पोस्टमनने आपला विनयभंग केला, हा नवऱ्याचा आरोपही खरा नाही. त्यांना तसा भास झाला असावा आणि त्यातून हा प्रकार घडला. मात्र, या प्रकरणात माझ्या नवऱ्याला न्यायालयानं दोषी ठरवलं तर माझा संसार उद्ध्वस्त होईल. मुलांसह मी रस्त्यावर येईन. तेव्हा न्यायाधीशांनी या चुकीबद्दल त्यांना क्षमा करावी.

याउलट, पोस्टमनचं म्हणणं.. की या गृहस्थाला मोकाट सोडलं तर तो आपला खूनच करेल. आणि माझ्यावर अवलंबून असलेलं माझं कुटुंब देशोधडीला लागेल.

न्यायाधीश उभय बाजू ऐकून संभ्रमात पडतात. कारण दोघेही आरोपी होते आणि फिर्यादीसुद्धा. आणि ज्या व्यक्तीच्या संदर्भात ही घटना घडली होती तिनेही कुणा एकाची बाजू घेतली नव्हती. आणि घटनास्थळी दुसरा कुणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नव्हता. आता न्यायनिवाडा कसा करायचा? यातला गुन्हेगार नेमका कोण, या निष्कर्षांवर येणं मुश्कील होतं. परंतु या प्रकरणात काहीतरी पाणी नक्कीच मुरतंय हे त्यांना स्वच्छपणे जाणवत होतं. पण ते काय, हे पुराव्याशिवाय सिद्ध करणं अशक्य होतं. सबब ते संशयाचा फायदा देऊन आणि दोघांच्या कुटुंबांचा विचार करून त्यांना फक्त समज देऊन त्यांची मुक्तता करतात.

पण तरी न्यायाधीशांना हा प्रश्न छळतच राहतो, की या दोघांत नेमका दोषी कोण? कारण मदानेच्या पत्नीने दोघांपैकी कुणाचीच बाजू उचलून धरलेली नव्हती.

इथं पहिला अंक संपतो.

दुसऱ्या अंकात प्रत्यक्षात काय घडलं हे बैजवारपणे येतं. त्यातून तिन्ही व्यक्तींच्या मनातले भावनिक-मानसिक कल्लोळ आणि प्रत्यक्ष घडलेला घटनाक्रम उलगडत जातो.

राजन खान यांच्या ‘ग्वाही’ कथेवर आधारीत या नाटकात काही गोष्टी पूर्णपणे दुर्लक्षिल्या गेल्या आहेत. कारण न्यायालयात एखाद्या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जरी उपलब्ध नसला तरी घडलेल्या गुन्ह्य़ाचा अन्य तऱ्हेने माग काढून गुन्हेगारावरील आरोप सिद्ध केले जातात. इथंही न्यायालयास हा मार्ग अवलंबिता आला असता. मदानेंच्या शेजाऱ्यांचे जाबजबाब घेतले असते तरी घडलेली घटना सप्रमाण शाबीत करता आली असती. पण त्याकडे संपूर्ण काणाडोळा केला गेला आहे. घटनेत गुंतलेल्या तिन्ही व्यक्ती सोयीनं खोटं बोलताहेत हे सिद्ध करणं काहीच अवघड नव्हतं. परंतु साक्षीपुरावे, जाबजबाबांच्या भानगडीत न पडता न्यायाधीशही संभ्रमित निष्कर्षांप्रत येतात. दुसरी गोष्ट म्हणजे या खटल्यात गुन्ह्य़ाचा तपास करणारे पोलीस आणि वकीलही गायब आहेत. आरोपी/साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून पोस्टमन आणि मदाने आपलं निवेदन करतात. मंगला मदानेही त्यांचं म्हणणं मांडतात. आणि न्यायाधीश त्यावर आधारित आपला निकाल देतात. बस्स. एवढंच घडतं. नंतर न्यायाधीश या निकालावर चिंतन करत असताना दुसऱ्या अंकात प्रत्येकाची बाजू घटनारूपात येते. त्यातून मूळ घटनेची उकल होत जाते. लेखक-दिग्दर्शक संदेश जाधव यांनी संहितेतील हे कच्चे दुवे तसेच राहू देत प्रयोग रचला आहे. त्यातून मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि व्यामिश्रता समोर येत असली तरी प्रयोगाची मांडणी एकरेषीय होते. यातील सर्व पात्रं मात्र खरीखुरी, हाडामांसाची माणसं वाटतात. त्यांचे गुण-दोष, कमकुवतपणा ‘त्या’ घटनेतून व्यक्त होतो. एक खोल जीवनदर्शन त्यातून घडतं. परंतु नाटक म्हणून ते आपल्याला समाधान देतं का? याचं उत्तर ‘पुरेसं नाही’ हेच द्यावं लागेल. याचं कारण त्याची दोषयुक्त मांडणी. नाटकातील पात्रांच्या आजूबाजूस काहीएक भोवताल आहे, इतर माणसंही आहेत, हेच इथं विसरलं गेलं आहे. माणसांच्या मनात घडणारी आंदोलनं आणि त्यांचे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात उमटणारे पडसाद एवढय़ापुरतंच नाटक सीमित राहिल्याने त्यातल्या इतर मिती अस्पर्श राहिल्या आहेत. ज्यामुळे नाटक कदाचित वेगळ्या वळणावर जाऊ शकलं असतं.

संदेश बेंद्रे यांनी मदानेंचं चाळीतलं घर त्यातल्या तपशिलांनिशी यथार्थपणे उभं केलं आहे. श्याम चव्हाण (प्रकाशयोजना), अक्षय जाधव (संगीत), उदय तंगाडी (रंगभूषा) आणि संध्या कुलकर्णी (वेशभूषा) यांनी तांत्रिक बाजू उत्तमरीत्या सांभाळल्या आहेत.

हा नाटय़ानुभव जिवंत केला आहे तो यातील कलाकारांनी. संदेश जाधव यांनी नाकासमोर चालणारा, सरळमार्गी नवरा आणि नंतर बायकोच्या वर्तनातील बदलांनी संशयाने हळूहळू पछाडत गेलेला विनायक मदाने त्याच्या घुसमटीसह अप्रतिम साकारला आहे. ‘आपला संसार बरा की आपण बरे’ या वृत्तीचे मदाने न्यायाधीशांच्या निकालानंतर पुनश्च सरळमार्गी गृहस्थाच्या आपल्या मूळ भूमिकेत परततात. याउलट, मंगला एका मोहाच्या क्षणी पोस्टमनच्या आहारी गेल्याने सतत तणावाखाली वावरत राहते. त्यातून मदानेंचा संशय बळावत जातो. परंतु एका क्षणी पोस्टमनचं खरं रूप उघड झाल्यावर आपला संसार वाचवायचा असेल तर त्याच्या फासातून आपली सुटका करून घ्यायला हवी, या निर्णयाशी आलेल्या मंगलाला ‘ती’ घटना ही संधी पुरवते. आणि त्या घटनेचा फायदा घेऊन मंगला पोस्टमन आणि नवऱ्यालाही त्या ‘संकटा’तून सोडवत आपलं उद्दिष्ट साध्य करते.. आपल्या संसारात सहीसलामत परतते. हा सारा प्रवास नम्रता काळसेकरांनी प्रत्ययकारी केला आहे. पोस्टमनचं खलत्व सुनील जाधव यांनी पुरेशा कावेबाजपणे व्यक्त केलं आहे. न्यायाधीशांच्या भूमिकेत डॉ. कनक नागले शोभले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajan khan marathi natak
Show comments