dilip thakurचित्रपटाच्या वाटचालीत नायक व नायिका यांची जोडी प्रकरण हा रंगतदार चौफेर विषय असून, अनेक चित्रपटांमधून त्यांनी एकत्र भूमिका साकारल्या एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नसतो. राजेश खन्ना व मुमताज या जोडीचे बघा. काय मस्त जमली होती ही जोडी. पण कशी? स्टंटपटात दारासिंगची नायिका म्हणून गाजलेली मुमताज आपले सौंदर्य, अभिनय आणि नृत्य या गुणावर मुख्य प्रवाहात आली. राजेश खन्नाची ती नायिका होणे चांगले जमून आले आणि शोभले देखील. ‘ दो रास्ते’, ‘बंधन’, ‘अपना देश’, ‘सच्चा झूठा’, ‘दुश्मन’, ‘आप की कसम’, ‘रोटी’ आणि ‘आयना’ असे या जोडीचे आठ चित्रपट गाजले. तर राज खोसलांच्या ‘प्रेम कहानी’ला चित्रपट रसिकांनी नाकारले, तरी चित्रपटातील या जोडीचे रसायन मस्तच जमले होते. मोठ्या पडद्यावर प्रेम प्रसंगापासून भावनिक दृश्यांपर्यंत अनेक दृश्ये त्यांनी लिलया साकारली. या जोडीचे कोणतेही गाणे पहाताना ते अभिनय करत आहेत असे वाटत नाही. कॅमेरासमोर येण्यापूर्वीच त्यांचे चांगले ट्युनिंग जुळलेले जाणवते. आजही ती गीते तजेलदार वाटतात पुन्हा पहावीशी वाटतात यात बरेच काही आले. राजेशचा पडता काळ आणि मुमताजचे लग्न हे साधारण एकाच वेळी म्हणजे १९७६ साली घडावे हे दोघांचेही दुर्देव. अन्यथा मुमताजसोबतच्या एखाद्या चित्रपटाने राजेश कदाचित सावरला असता. तिने लग्नानंतर संसाराला प्राधान्य दिले. केवळ हिंदी चित्रपटांमधील नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपटांमधील आकर्षक व यशस्वी जोडीचा इतिहास लिहिताना राजेश मुमताज जोडीला मानाचे स्थान असेल. मोठ्या पडद्यावरील छेडछाडीचा प्रसंग असो वा पाऊस पाण्यात चिंब होण्याचा या दोघांनी जोडीने आनंद घेतला, त्याचबरोबर प्रेक्षकांनादेखील आनंद दिला. हे दोन्ही महत्वाचे असते. होय ना?

Story img Loader