बॉलिवूडमधले सर्वात पहिले मेगास्टार….ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलं…बॉलिवूडमध्ये ‘काका’ नावाने प्रसिद्ध झालेले दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी जो स्टारडम पाहिला तो कदाचित कोणत्याच सुपरस्टारच्या नशिबात आला नसेल. अभिनेते राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेऊन आज नऊ वर्ष पूर्ण झाले. आजच्याच दिवशी म्हणजेच १८ जुलै २०१२ रोजी त्यांचं निधन झालं. मेगास्टार राजेश खन्ना आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट आणि गाण्यांच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनात अजुनही जिवंत आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने आम्ही सांगणार आहोत कसा त्यांना मेगास्टारचा टॅग मिळाला आणि जगाचा निरोप घेताना काय होते त्यांचे शेवटचे शब्द…
कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालं यश
राजेश खन्ना हे ७० ते ८० च्या दशकातील बॉलिवूडमधले टॉप अभिनेते होते. एक काळ असाही होता, राजेश खन्ना म्हटलं की चित्रपट हिट होणारंच असं गणितच बनलं होतं. पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर लगचेच त्यांना यश मिळालं नव्हतं. कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना बॉलिवूडमध्ये ‘सुपरस्टार’ हा टॅग मिळाला होता.
राजेश खन्ना हे खरं नाव नव्हतं…
राजेश खन्ना यांना त्यांचे फॅन्स ‘काका’ या नावाने हाक मारत असत. राजेश खन्ना यांचं पहिलं नाव ‘जतिन खन्ना’ असं होतं. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. म्हणनूच त्यांनी त्यांच्या करिअरची सुरवात थिएटरपासून केली आणि बघता बघता त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं.

३ वर्षाच्या संघर्षानंतर मिळाली लोकप्रियता
राजेश खन्ना यांनी त्यांच्या अभिनयातील करिअरची सुरूवात चेतन आंनद यांच्या ‘आखिरी खत’ या चित्रपटातून केली. हा चित्रपट १९६६ मध्ये रिलीज झाला होता. पण या चित्रपटातून त्यांना हवं तसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतर त्यांनी स्वतःला एक अभिनेता म्हणून सिद्ध करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यानंतर १९६९ साली रिलीज झालेल्या शक्ति सामंत यांच्या ‘अराधना’ चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर त्यांची ओळख एक रोमॅण्टिक हिरो अशी झाली होती. यानंतर राजेश खन्ना हे पहिले असे सुपरस्टार होते ज्यांचे लागोपाठ १५ चित्रपट सुपरहिट ठरले.
काकाच्या लूकवर फिदा होत्या मुली
राजेश खन्ना यांच्या लूकवर त्या काळातल्या मुली इतक्या फिदा होत्या की, रस्त्यावरून त्यांची गाडी गेल्यानंतर जी धूळ उडत होती, ती त्यांच्या कपाळावर कुंकू म्हणून लावत होत्या. आजही राजेश खन्ना यांच्या स्टारडममधील अनेक किस्से ऐकण्यासाठी फॅन्स पसंती देतात.

हे होते शेवटचे शब्द….
राजेश खन्ना त्यांच्या अखेरच्या काळात खूपच आजारी पडले होते. अखरेच्या काळात त्यांनी अन्नपाणी सोडले होते. शिवाय ते औषधांनाही प्रतिसाद देत नव्हते आणि आजापरपणामुळेच १८ जुलै २०१२ रोजी त्यांचं निधन झालं. राजेश खन्ना त्यांच्या शेवटच्या क्षणी मुलगी ट्विंकल आणि जावई अक्षय कुमार या दोघांच्या अतिशय जवळ होते. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांचे जवळचे मित्र अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून शोक व्यक्त केला होता. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉग लिहिलं होतं की, जेव्हा ते राजेश खन्ना यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितलं, “राजेश खन्ना यांचे शेवटचे शब्द होते, टाईम इज अप, पॅक अप!”
डोळे पाणावणारी राजेश खन्ना यांची अंत्ययात्रा
१८ जुलै २०१२ रोजी ज्यावेळी राजेश खन्ना त्यांच्या अंतिम प्रवासासाठी निघाले होते, त्यावेळी त्यांचे कुटुंबीय, जवळच्या मित्र परिवारांसह फॅन्सनेही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांचा हा अंतिम प्रवास पाहून फॅन्सच्या डोळ्यात अश्रू झिरपत होते. मुसळधार पावसातसुद्धा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडकरांसह फॅन्सची रिघ लागली होती. अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र, शाहरुख खान, ऋषी कपूर, सलमान खानसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी काकांना अखेरचा निरोप दिला होता.