देशाच्या नव्या संसद भवनाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा दिल्लीत सुरू असताना याबाबत सिनेसृष्टीतील मान्यवरांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटींसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि कमल हासन यांनीही नव्या संसदेसाठी देशवासीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा : ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजची घोषणा; मराठमोळा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर शेअर करीत म्हणाला…
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी “तमिळ सत्तेचे पारंपरिक प्रतीक असलेला राजदंड भारताच्या नव्या संसदेत शोभून दिसेल, तमिळ समाजाचा आणि आमच्या संस्कृतीचा अभिमान वाढवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे खूप खूप आभार…” असे ट्वीट करीत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : IPL 2023 चे विजेतेपद कोणता संघ जिंकेल? उर्वशी रौतेला म्हणाली…
दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी त्यांचा सहभागात्मक लोकशाहीवर विश्वास असल्याने नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या सर्व विरोधी पक्षांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन केले आहे. कमल हासन म्हणाले, “या कार्यक्रमाबद्दल असलेले मतभेद हे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाऊ शकतात. नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आपल्याकडे असेल. आपले राजकीय मतभेद एका दिवसासाठी बाजूला ठेवत, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय एकात्मता दाखवू या.”
दरम्यान, सेंगोल स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी संसदेच्या बांधकामात सहभागी असलेल्या कामगारांचा गौरव केला. यानंतर झालेल्या सर्वधर्मीय प्रार्थना सभेला केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.