Happy Birthday Rajinikanth: रजनीकांत म्हटलं की आपोआप ‘थलायवा’ किंवा ‘सुपरस्टार’ ही बिरुदं समोर येतातच. तसंच समोर येते ती त्यांची खास स्टाईल. नाणं उडवून झेलणं असो, सिगारेट किंवा पाईप ओढणं असो किंवा साधा रुमाल फिरवून गळण्यात घालणं असो हे करावं तर रजनीकांत यांनीच. सिनेमा पाहणं जिथे संस्कृती मानली जाते त्या दक्षिणेत रजनीसरांची क्रेझ आजही कायम आहे. आज रजनीकांत यांचा ७३ वा वाढदिवस आहे. मात्र त्यांची जादू तसूभरही कमी झालेली नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीसर देवासारखेच आहेत. रजनीकांत चा सिनेमा आला की तिथले लोक अजूनही त्यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात अशी अनेक उदाहरणं घडली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात महागडा सुपरस्टार

२०२३ मध्ये रजनीकांतचा ‘जेलर’ हा सिनेमा आला जो प्रचंड चालला. त्या सिनेमानंतर आला ‘थलाइवर १७१’ एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांनी या सिनेमासाठी २८० कोटी रुपये मानधन घेतलं. ‘कबाली’, ‘शिवाजी द बॉस’, ‘काला’ या चित्रपटांसाठीही रजनीकांत यांनी अशाच प्रकारे तगडं मानधन घेतल्याची चर्चा झाली होती. सिनेमासृष्टीतले सर्वात महागडे सुपरस्टार असा त्यांचा लौकिक आहे.

रजनीकांत

रजनीकांत यांचा जन्म मराठी कुटुंबातला

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० या दिवशी एका मराठी कुटुंबात झाला. रजीनकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांचे वडील पोलीस होते. १९७५ मध्ये आलेल्या ‘अपूर्व रागंगल’ या सिनेमातून त्यांनी सिनेमासृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात रजनीकांत यांनी सपोर्टिंग भूमिका केली होती. हिंदी सिनेमासृष्टीतला रजनीकांत यांचा पहिला सिनेमा होता ‘अंधा कानून’ टी. रामाराव यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यानंतर रजनीकांत यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

बस कंडक्टर म्हणून केलं काम

दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी सुरुवातीला बस कंडक्टर म्हणूनही काम केलं. तसंच आपलं घर चालवण्यासाठी ते छोटी मोठी कामं करायचे. रजनीकांत आपल्या दमदार आवाजात आणि अनोख्या स्टाईलमध्ये तिकिट द्यायचे. त्यामुळे रजनीकांत यांची चर्चा होत असे. इतर बस कंडक्टर आणि चालक यांच्यातही रजनीकांत त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे प्रसिद्ध झाले. एक दिवस असं घडलं की टोपी मुनिप्पा नावाचे एक नाटककार बसमध्ये प्रवास करत होते. त्यांची नजर रजनीकांत यांच्या स्टाईलवर पडली. त्यांनी तातडीने रजनीकांत यांना नाटकात काम करण्याची ऑफर दिली जी रजनीकांत यांनी मान्य केली. बस कंडक्टरची नोकरी आणि नाटकात काम असं दोन्ही रजनीकांत करु लागले.

रजनीकांत यांचा कबाली सिनेमातला लुक

पहिला सिनेमा कसा मिळाला?

रजनीकांत यांची आर्थिक परिस्थिती सुरुवातीच्या काळात चांगली नव्हती. मात्र त्यांनी एका मित्राच्या मदतीने अॅक्टिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला. तिथे के बालाचंदर यांनी त्यांना पाहिलं. त्यांना सांगितलं तू जर तामिळ भाषा शिकलास तर तुला मी सिनेमात काम देईन. त्यानंतर काही दिवसांतच रजनीकांत यांनी तामिळ भाषा शिकली. कमल हासन आणि श्रीविद्या हे दोघे रांगागल सिनेमात मुख्य भूमिकेत होते. मात्र सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत असलेल्या रजनीकांत यांनी प्रेक्षकांचं लक्ष आपल्या खास स्टाईलने वेधून घेतलं.

काही चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका केल्यानंतर १९७६ मध्ये ‘मुंदरु मुदिचू’ या सिनेमात रजनीकांत यांना मोठा रोल मिळाला. त्या सिनेमातही कमल हासन होते. कमल हासन यांना ३० हजार रुपये मानधन मिळालं होतं. तर रजनीकांत यांना दोन हजार रुपये. या सिनेमातली रजनीकांत यांची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल लोकांना खूपच आवडली आणि लोक ही स्टाईल कॉपीही करु लागले.

१९७७ मध्ये आलेला ‘चिलाकम्मा चेप्पिंदी’ हा सिनेमा रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. १९७८ मध्ये आलेला बैरवी आणि त्यानंतर १९८० मध्ये आलेला बिल्ला यामुळे रजनीकांत सुपरस्टार झाले.

१९८० मध्ये आलेला ‘बिल्ला’ सिनेमा सुपरडुपर हिट

बिल्ला सिनेमा १९८० मध्ये आला. हा सिनेमा हिंदी सिनेमा डॉनचा रिमेक होता. मात्र रजनीकांत यांनी ज्या अनोख्या स्टाईलमध्ये तो साकारला ते पाहून प्रेक्षक त्यांचे चाहते झाले. हा सिनेमा २५ आठवडे सिनेमागृहात चालला होता. त्यानंतर रजनीकांत हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले सुपरस्टार म्हणून उदयास आले. रजनीकांत यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या १० वर्षांमध्येच १०० सिनेमांमध्ये काम केलं. हा रेकॉर्डही त्यांच्याच नावावर आहे. बिल्लानंतर तामिळ सिनेमातल्या टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीत रजनीकांत जाऊन बसले. त्यांचं स्थान अजूनही कायम आहे.

खास स्टाईल आणि चाहत्यांचे किस्से

सिगारेट, रुमाल किंवा नाणं फिरवण्याची ते हवेत उडवून झेलण्याची खास स्टाईल, उत्तम अभिनय आणि प्रेक्षकांना हवं असणारं मनोरंजन हे सूत्र रजनीकांत यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमात जपलं. ज्यामुळे रजनीकांत हे प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत झाले. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी रजनीकांत यांचं मंदिरही बांधलं आहे. इतकंच नाही तर रजनीकांतचा सिनेमा पाहण्यासाठी दाक्षिणात्य कंपन्या सुट्टी जाहीर करतात हे देखील वास्तव आहे. त्यांचा कबाली हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर हे घडलं होतं. तर काही कंपन्यांनी त्यांच्या या सिनेमाची फ्री तिकिटं आपल्या कर्मचाऱ्यांना दिली होती. रजनीकांत यांच्या नावे ६६ हजार रजिस्टर्ड फॅन क्लब आहेत. तर नोंदणी न झालेले अगणित फॅन क्लब तर आहेतच. जेव्हा रजनीसर आजारी पडतात किंवा त्यांना काही त्रास आहे असं लोकांना वाटतं तेव्हा लोक यज्ञ करतात, नवस बोलतात, अनवाणी चालत मंदिरात जातात.

राजकारणात एंट्री आणि नंतर फारकत

दक्षिणेत आणखी एक परंपरा आहे ती म्हणजे तिथले सुपरस्टार राजकारणात जातात. रजनीकांत त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी २०१७ मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन आपण लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याचं सांगितलं. तसंच तामिळनाडूमध्ये निवडणुका लढवणार असल्याचंही स्पष्ट केलं. रजनी मक्कल मंद्रम हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र जुलै २०२१ मध्ये त्यांनी आपला पक्ष विसर्जित केला आणि राजकारणात येण्याची यापुढे कुठलीही योजना नाही असंही सांगितलं. जयललिता आणि त्यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांचं घरही पोएस गार्डन या भागातच आहे. १९९६ ची निवडणूक जयललिता माझ्यामुळे हरल्या असं रजनीकांत यांनी सांगितलं होतं. तसंच रजनीकांत आणि जयललिता यांचा आणखी एक किस्साही चर्चिला गेला होता.

जयललिता यांच्यासह घडलेला किस्सा काय होता?

जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्या पोएस गार्डन या ठिकाणी असलेल्या बंगल्यातून बाहेर पडणार होत्या. त्यामुळे अशी घोषणा करण्यात आली की मुख्यमंत्री जयललिता घराबाहेर पडणार आहेत कुणीही बाहेर पडू नये. रजनीकांत यांनाही नेमकं त्याचवेळी बाहेर जायचं होतं. त्यांनी ही घोषणा ऐकली.. कार बाहेर काढली आणि त्या कारच्या बोनेटवर सिगारेट ओढत बसले. रजनीकांत कारच्या बोनेटवर बसलेत म्हटल्यावर तिथे काही क्षणात साधारण १० हजार लोकांची गर्दी झाली. जयललिता यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्या म्हणाल्या आधी रजनीकांत यांना जाऊदेत मग मी जाते… आणि घडलंही तसंच. रजत शर्मा यांनी हा किस्सा सांगितला होता.

रजनीकांत हे अमिताभ बच्चनन यांना आदर्श मानतात. ही बाब त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. हम या सिनेमात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. तसंच अंधा कानून या सिनेमातही हे दोघं होते. आता तीन दशकांहून अधिक काळाने अमिताभ बच्चन आणि रजनीसर एकत्र येत आहेत. ‘थलाइवर १७१’ या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन आणि सगळ्यांचे लाडके सुपरस्टार रजनीसर एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करेल यात काही शंकाच नाही. रजनीकांत यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची कारकीर्द उत्तम आहे आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आजही तसूभरही कमी झालेली नाही. त्यांना मिळणारं यश हे असंच उदंड राहो याच शुभेच्छा!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth birthday special article on his career and unkonwn stories about him scj
First published on: 12-12-2023 at 07:25 IST