सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषची पहिली पत्नी ऐश्वर्या रजनीकांतच्या लग्नातील दागिने त्यांच्या घरातून चोरीला गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंदर्भात ऐश्वर्याने चेन्नईच्या तेनमपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेतली आहे. ऐश्वर्याने तिच्या चेन्नईच्या घरातील ६० तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने गायब असल्याचा दावा केला आहे.
या दागिन्यांची किंमत ३०.६० लाख रुपये आहे. या दागिन्यांचे वजन सुमारे ६० तोळे असल्याचं स्पष्ट झालं आहे. ऐश्वर्याने पोलिसांत सांगितले की, तिने हे दागिने २०१९ मध्ये तिची बहीण सौंदर्याच्या लग्नासाठी वापरले होते. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत ऐश्वर्याने सांगितले की, तिने दागिने घरातील लॉकरमध्ये ठेवले होते. तिच्याखेरीज काही नोकरांना या गोष्टीची माहिती होती. तेनमपेट पोलिसांनी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ऐश्वर्याने हे दागिने शेवटचे आपल्या बहिणीच्या लग्नातच पाहिले असल्याची खात्रीदेखील केली आहे.
आणखी वाचा : “ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लीलता…” भाजपा नेते अनुराग ठाकूर यांचं मोठं विधान
ऐश्वर्या सध्या तिच्या ‘लाल सलाम’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती तामिळनाडूच्या वेगवेगळ्या शहरात शूटिंगसाठी फिरत आहे. ऐश्वर्याने तिच्या तक्रारीत असेही म्हटले आहे की तिचे दागिने २०२१ साली तीन ठिकाणी हलवण्यात आले होते. तिचा पती धनुषच्या एका राहत्या घरीसुद्धा ते दागिने हलवण्यात आल्याचा खुलासा तिने केला आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ते दागिने सेंट मेरी रोड, चेन्नई येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये लॉकर त्यांच्या पोस गार्डनच्या घरी नेण्यात आले आणि सेंट मेरी रोडवरील घरात लॉकरच्या चाव्या असल्याचं ऐश्वर्याने स्पष्ट केलं आहे. १० फेब्रुवारीला जेव्हा ऐश्वर्याने ही तिजोरी उघडून पाहिली तर त्यात तिच्या लग्नाचे दागिने गायब असल्याचं स्पष्ट झालं.
ऐश्वर्या रजनीकांतने आपल्या तक्रारीत त्यांची मोलकरीण ईश्वरी, लक्ष्मी आणि ड्रायव्हर व्यंकट यांच्यावर संशय घेतला आहे. कारण हे तिघेही सेंट मेरी रोड येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये येत असल्याचं तिने सांगितलं आहे. ऐश्वर्या रजनीकांतने २००४ मध्ये धनुषशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला दोन मुले आहेत. गेल्या वर्षी २०२२ मध्ये हे दोघे वेगळे झाले, याचा त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. ऐश्वर्याच्या आगामी ‘लाल सलाम’ या चित्रपटात वडील आणि सुपरस्टार रजनीकांत एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.