सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित ‘२.०’ या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. अक्षय कुमार आणि संगीतकार ए.आर.रेहमान यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘२.०’ चित्रपटाचा पोस्टर ट्विट केला. पोस्टरमध्ये ‘२.०’ चित्रपटाचे बोधचिन्ह मोठ्या स्वरूपात दाखविण्यात आले असून त्याखाली रजनीकांत यांची छबी दाखविण्यात आली आहे. एस.शंकर निर्मित या चित्रपटाचा पहिला व्हिडिओ लूक २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावेळी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.
Get ready to experience the most expected #2Point0Firstlook on 20th Nov at 5 PM
Live streaming on https://t.co/eBHcUlKp5b pic.twitter.com/b5PxovoeiI— 2.0 (@2Point0movie) November 16, 2016
विशेष म्हणजे, ‘२.०’ हा चित्रपट आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. तब्बल ३५० कोटी खर्चून चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच चित्रपटात अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. ऑस्कर विजेते सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाता संगीत दिले आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ एका खास पद्धतीने प्रदर्शित करण्यात येणार आहे. यशराज स्टुडिओमध्ये फर्स्ट लूक प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर पाहता येणार आहे. याशिवाय मोबाईल अॅप देखील तयार करण्यात आले आहे. स्मार्टफोन धारकांना या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोबाईल अॅपवर पाहता येणार आहे.