मी सध्या रजनीकांत यांच्यासोबत चित्रपट करायचा ठरवले तर, त्यांचे चाहते मला ठार मारतील, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी व्यक्त केली. रामगोपाल वर्मा यांनी काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. रजनीकांत यांच्यासारखे रूप असणारा माणूस सुपरस्टार कसा काय होऊ शकतो, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून रामगोपाल वर्मा यांच्यावर टीकेचा वर्षाव करण्यात आला होता. मात्र, रजनीकांत यांचे काही चाहते इतके मठ्ठ आहेत की, मी रजनीकांत यांची स्तुती करत आहे ही साधी गोष्टही त्यांना समजत नाही. दिसायला सुंदर असणारा एखादा माणूस सुपरस्टार झाला तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही, हे नेहमीच घडते. मात्र, रजनीकांत यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती सुपरस्टार होते, ही खरंच कौतुकाची बाब आहे, असे रामगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले. ‘वीरप्पन’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलते होते.
दैवकृपेने रजनीकांत यांनी इतरांपेक्षा खूप काही मिळवले आहे. एवढेच माझे म्हणणे होते. मात्र, त्यांच्या काही मठ्ठ चाहत्यांना ही गोष्ट समजत नसल्याचे वर्मा यांनी म्हटले. तुम्ही भविष्यात रजनीकांत यांच्यासोबत एखादा चित्रपट करणार का, असा प्रश्नही यावेळी रामगोपाल वर्मा यांना विचारण्यात आला. मी जर आता त्यांच्यासोबत चित्रपट करायचे ठरवले तर त्यांचे चाहते मला ठार मारतील. त्यामुळे जोपर्यंत त्यांच मठ्ठ चाहते शांत होत नाहीत तोपर्यंत मी तसा विचार करने, असेही वर्मा यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth fans will kill me if i make a film with him ram gopal varma