Rajinikanth Hospitalized in Chennai: सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पोट दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर रजनीकांत यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अभिनेते रजनीकांत यांना सोमवारी रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोट खूप दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती चेन्नई पोलिसांनी दिल्याची पोस्ट एएनआय या वृत्तसंस्थेने केली आहे.
७३ वर्षीय रजनीकांत यांची प्रकृती आता स्थिर आहे, त्यांच्यावर एक नियोजित शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहितीही समोर येत आहे. सीएनएन न्यूज १८ च्या वृत्तानुसार, रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. पण त्यांनी फार माहिती दिलेली नाही. “सगळं ठीक आहे”, एवढंच त्या म्हणाल्या.
रजनीकांत यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच चाहते सोशल मीडियावर रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत.