ridhima01मनोरंजनाच्या क्षेत्रात रजनीकांत यांचा आजही फार मोठा पडगा आहे. दक्षिणेतील या सुपरस्टारच्या वैशिष्ट्यपूर्ण लकबीचा आणि नावाचा अनेकजण अवलंब करताना दिसतात. यातून बॉलिवूडदेखील सुटलेले नाही. आता छोट्या पडद्यावरील एका मालिकेत रजनीकांत यांच्या नावाचा करिष्मा उपयोगात आणला जाणार आहे. तसा रजनीकांत यांचा या मालिकेशी थेट संबंध नाही. परंतु, निर्मात्यांनी त्यांच्या नावातून प्रेरणा घेऊन मालिकेचे नाव ‘हमारी बहू रजनीकांत’ असे ठेवले आहे. रिधीमा पंडीत नावाची अभिनेत्री मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिधीमाचे मालिकेतील नाव रजनी असून, कांत आडनावाच्या व्यक्तिशी तिचे लग्न होते आणि लग्नानंतर तिचे नाव ‘रजनी कांत’ असे होते. सोसायटीमध्ये ती ‘रजनीकांत’ नावानेच ओळखली जाते. ही भूमिका आधी प्रिया रैना नावाची अभिनेत्री साकारणार होती. परंतु, रिधीमाने रातोरात प्रियाची मालिकेतील जागा हस्तगत केली. या भूमिकेसाठी रिधीमा योग्य असल्याचे मालिकाकर्त्यांना वाटत असल्याने त्यांनी प्रियाची मालिकेतून गच्छंती केल्याचे सूत्रांनी सांगितले.