सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांची मुलगी ऐश्वर्याचा ‘संघी’ शब्दावरून तिने केलेल्या विधानानंतर बचाव केला आहे. ‘संघी हा शब्द वाईट आहे असं ऐश्वर्याने कधीच म्हटलं नाही’, असं रजनीकांत म्हणाले. ‘लाल सलाम’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या म्हणाली होती की तिचे एक्स व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी दावा केला आहे की रजनीकांत हे संघी आहेत, पण जर ते संघी असते तर त्यांनी ‘लाल सलाम’ सारखा चित्रपट केला नसता.
ऐश्वर्या रजनीकांत ‘लाल सलाम’मधून दिग्दर्शिका म्हणून पुनरागमन करत आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुलगी ऐश्वर्याने केलेल्या विधानानंतर तिचा बचाव करताना रजनीकांत म्हणाले, “माझ्या मुलीने संघी हा शब्द वाईट आहे असं कधीच म्हटलं नाही. तिने प्रश्न केला की तिचे वडील अध्यात्मिक आहेत, मग त्यांना अशा प्रकारे संघी का म्हटलं जातंय.” यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय.
२६ जानेवारीला चेन्नईतील एका खासगी महाविद्यालयात ‘लाल सलाम’ चित्रपटाचा ऑडिओ लाँच कार्यक्रम झाला. यावेळी ऐश्वर्या म्हणाली, “मी सहसा सोशल मीडियापासून दूर राहते, पण माझी टीम अनेकदा मला काय घडत आहे ते सांगते आणि काही पोस्ट्स दाखवत राहते. त्या पाहून मला राग यायचा. आपणही माणसं आहोत. अलीकडच्या काळात बरेच लोक माझ्या वडिलांना संघी म्हणतात. मला त्याचा अर्थ काय आहे हे माहित नव्हतं. मग मी कोणाला तरी विचारलं की संघीचा अर्थ काय आहे आणि ते म्हणाले की जे लोक एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करतात त्यांना संघी म्हणतात.”
पुढे ऐश्वर्या म्हणाली, “मी इथं स्पष्ट करू इच्छिते की माझे वडील रजनीकांत हे संघी नाहीत. ते संघी असते तर त्यांनी ‘लाल सलाम’ सारखा चित्रपट केला नसता.” मुलगी ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून रजनीकांत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.