दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमात झळकणार आहेत. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमधील एपिसोड शूट होणार आहे. व्याघ्र संवर्धन प्रकल्पांतर्गत १९७४ साली हे उद्यान स्थापन करण्यात आले.

आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये ‘थलायवा’ रजनीकांत यांनी विविध भूमिका साकारत भरपूर प्रसिद्धी मिळवली. केवळ दाक्षिणात्यच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांची क्रेझ पाहायला मिळते. आपल्या स्टाइलसाठी ते विशेष ओळखले जातात. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमध्ये त्यांना पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. ‘दोन वाघांचा सामना पाहायला मिळणार’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रजनीकांत यांच्या बेअर ग्रिल्ससोबतच्या या एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.

याआधी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमध्ये हजेरी लावली होती. मोदींचा हा एपिसोड तुफान गाजला. ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा चेहरा म्हणजे बेअर ग्रील्स हा जगभरामध्ये त्याच्या साहसासाठी प्रसिद्ध आहे. एखादा माणूस संकटात अडकला तर तो कसा वाचू शकेल याबद्दलचे प्रात्यक्षिके दाखवणारा बेअरचा चेहरा ‘डिस्कव्हरी’वरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मुळे घराघरात पोहचला आहे. जंगलामध्ये एकटेच अडकल्यावर आपण नैसर्गिक साधनांचा वापर करुन लोकवस्तीपर्यंत कशाप्रकारे पोहचू शकतो याबद्दल भाष्य करणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला असून १८० हून अधिक देशांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो.

Story img Loader