गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण दक्षिण भारतात कबालीचीच हवा आहे. ‘कबाली’च्या प्रदर्शनानिमित्त दक्षिणेतील अनेक कार्पोरेट कंपन्यांनी शुक्रवारी सुटीदेखील जाहीर केली. मुंबईमध्ये माटुंग्यातील अरोरा टॉकीजमध्ये पहिल्या दिवशी कबालीचे सकाळी सहापासून शो लावण्यात आले. सकाळी सहाच्या शोला प्रेक्षकांनी असंख्य गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेता सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपटाचा पहिला शो सकाळी सव्वा आठ वाजता लावण्यात आला होता. पण हा शो हाऊसफुल्ल झाला नव्हता. यावरूनच मुंबईमध्येही रजनीकांतचे चाहते किती मोठ्या प्रमाणात आहेत, हे दिसून आले. इतकेच नाही तर पहिल्या शो सुरू झाल्यावर रजनीकांत पडद्यावर दिसताक्षणीच चाहत्यांनी जल्लोष केला. काही जणांनी पडद्यापुढील मोकळ्या जागेत जाऊन स्वतःजवळील पाचशे रुपयांच्या नोटा रजनीकांतवर उधळल्या.
चित्रपटात रजनीकांत यांना तीन लूकमध्ये दर्शविण्यात आले आहे. त्यांचा ३० वर्षीय तरुण अवतार हा ‘साईड पार्टिशन’ केशरचना आणि भरगच्च मिशा असलेला असा आहे. अन्य दोन लूक हे वृद्धापकाळातील असून एका लूकमध्ये त्यांना दाढीमध्ये दर्शविण्यात आले आहे, तर अन्य लूकमध्ये दाढी नाहिये. युवकाच्या लूकमधील रजनीकांत तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी बॉडी सूटचा वापर करण्यात आला आहे.
कथा- मलेशियातील तमिळ लोकांच्या हक्कासाठी, चीनी लोकांच्या समान दर्जा मिळावा यासाठी लढा देणारा एक धाडसी माणूस अनिच्छेने आणि परिस्थितीच्या रेट्याने गुंड बनतो. पंचवीस वर्षे तुरुंगात काढल्यानंतर आपल्या कुटुंबाचा शोध घेतो आणि शेवटी शत्रूंना संपवितो अशी सांगता येईल. या दरम्यान जी वळणे असतात, जे खटकेदार संवाद (‘तुझ्याकडे सत्तेची शक्ती आहे, माझ्याकडे जनतेची शक्ती आहे. माझ्या शक्तीपुढे तुझी शक्ती जुजुबी आहे’ – पडैयप्पा किंवा ‘जीवनात भय असावे, पण भय म्हणजेच जीवन बनता कामा नये’ – बाशा) असतात त्यांचा येथे सपशेल अभाव आहे. त्यामुळे कबालीचे वैयक्तिक दुःख आणि त्याच्या समाजाची वेदना या दोन चाकांवर संथ गतीने चित्रपटाचा गाडा पुढे जात राहतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा