दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित पेट्टा हा चित्रपट देशभरामध्ये आज प्रदर्शित झाला असला तरी हा चित्रपट आज एका राज्यात प्रदर्शित करण्यात आला नाही. तेलगु भाषेतील पेट्टा हा चित्रपट आज आंध्रप्रदेशमध्ये प्रदर्शित करण्यात आला नाही. चित्रपट वितरकांना या चित्रपटासाठी पुरेशी चित्रपटगृहे उपलब्ध करुन देण्यास अडचणी येतील असे वाटल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आठवड्यात आंध्रप्रदेशमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार नसून रजनीकांत यांच्या चाहत्यांना तेलगुमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
आंध्रप्रदेशमधील सिनेमागृहांमध्ये सध्या तीन मोठे चित्रपट दाखवले जाणार आहेत. यामध्ये एनटीआर यांच्या आयुष्यावर आधारीत ‘एनटीआर कथानायकूडू’, राम चरणची प्रमुख भूमिका असणारा ‘विन्या विंध्या रामा’ आणि वरुण तेजचा ‘एफ टू’ या चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी ‘एनटीआर कथानायकूडू’ हा काल प्रदर्शित झाला असून, ‘विन्या विंध्या रामा’ ११ जानेवारी रोजी तर ‘एफ टू’ हा १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे राज्यातील अनेक चित्रपटगृहांच्या मालकांनी आधीच चित्रपट प्रदर्शनासाठी तयारी केली आहे. तेलुगूमधील ‘पेट्टा’चे वितरक अशोक वल्लभानी यांनी निर्माते दिल राजू, अलू अरविंद आणि युव्ही क्रिएशन्सवर चित्रपटाला चित्रपटगृहे उपलब्ध न झाल्याने टिका केली आहे. अनेदा विनंती करुनही आम्हाला स्क्रीन्स देण्यात आल्या नाही असं सांगतानाच हा माफीया राज असल्याचा आरोप करत यामुळे चित्रपटाला फटका बसत असल्याचं अशोक म्हणाले होते.
दिल राजू यांनी ‘एफ टू’च्या प्रोमो प्रदर्शनाच्या वेळी याबद्दल मत व्यक्त केले होते. ”एनटीआर कथानायकूडू’, ‘विन्या विंध्या रामा’, ‘एफ टू’ या तिन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा सहा महिने आधीच जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अगदी तीन आठवडे आधी प्रदर्शनाची तारीख निश्चित करणारे ‘पेट्टा’चे वितरक चित्रपटगृहांकडे कोणत्या हक्काने स्क्रीन्सची मागणी करु शकतात?’ असा सवाल राजू यांनी उपस्थित केला आहे. तर अशोक यांच्या वक्तव्यावरही राजू यांनी मत व्यक्त करताना, अशोक यांनी काही हीन दर्जाची वक्तव्य केली आहेत, पण मी त्यांच्याप्रमाणे वक्तव्य करणार नाही. मला कोणालाही अडचणीत आणायचे नाहीय. भरपूर पैसे खर्च करुन तयार केलेल्या आमच्या चित्रपटांसाठी आम्हाला चित्रपटगृहे हवी आहेत. इथे सर्वचजण इथे व्यवसायाच्या दृष्टीने विचार करत आहेत त्यामुळे पैसे कमवणे हा आमचाही मुख्य उद्देश असल्याचे राजू यांनी सांगितले. तसचं संक्रांत सणाच्या जवळपास एकाच वेळी चित्रपटगृहांमध्ये तीन बड़्या चित्रपटांना जागा देतानाच मारामार असताना त्यात चौथ्या सिनेमाला जागा देणे शक्यच नसल्याचे मत राजू यांनी व्यक्त केले आहे.