बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेला राजीव अदातिया एलिमिनेट झाल्यानंतर सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यानं शिल्पा शेट्टीच्या घरी केलेली डिनर पार्टी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर तो सतत्यानं बिग बॉसच्या घरातील सदस्यांबाबत बोलताना दिसत आहे. अशात त्यानं आता एक धक्कादायक दावाही केला आहे. ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर राजीवच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. राजीवनं बिग बॉसच्या घरात दोन वेळा लहान मुलीचं भूत पाहिल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

राजीव अदातियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी बिग बॉसच्या घरात २ वेळा भूत पाहिलं आहे. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो आणि घरात झोपण्यास नकार दिला होता. त्यावेळी उमर, प्रतीक निशांत आणि मी घराच्या आतल्या भागात होतो. अचानक मी आणि निशांत उठून उभे राहिलो कारण आम्ही बिग बॉसच्या घरात एका लहान मुलीला पाहिलं होतं. आम्ही विचार करत होतो की, एवढी लहान मुलगी बिग बॉसच्या घरात कुठून आली. ती आमच्या बाजूने निघून गेली. हे सर्व मस्करी नाही आहे. बिग बॉसच्या घरात भूत आहे. मी याला लाइव्ह फीडवरही दोन वेळा पाहिलं आहे. त्या घटनेनंतर आम्ही घाबरुन गेलो होतो. ‘

काही आठवड्यांपूर्वीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या राजीवला बिग बॉसमधील त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. तो म्हणाला, ‘मला बिग बॉसच्या घराची खूप आठवण येते. मी हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी काल रात्री सिंबा नागपालला भेटलो. ही खूप चांगली भेट ठरली. आम्ही बिग बॉसच्या घरात एकमेकांसोबत चांगला वेळ व्यतित केला होता.’

राजीव अदातिया हा शमिता शेट्टीचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे शमिता या शोची विजेती व्हावी यासाठी तो सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, उमर रियाज, रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्जी, राखी सावंत, निशांत भट, प्रतीक सहजपाल आणि अभिजीत बिचुकले हे सदस्य या शर्यतीत अद्याप टिकून आहेत.

Story img Loader