बॉलिवूडचं कपूर कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. दिग्गज अभिनेते राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता राजीव यांची संपूर्ण संपत्ती ही कोणाला मिळणार यावरून आता प्रकरण हे कोर्टात पोहोचलं आहे.
रितू नंदा, राजीव कपूर, रिमा जैन, रणधीर कपूर, ऋषी कपूर या ५ भावंडांपैकी आता रिमा जैन आणि रणधीर कपूर हयात आहेत. गेल्या वर्षी ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यानंतर यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा सर्वात लहान भाऊ राजीव कपूर यांचे निधन झाले. राजीव कपूर यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर आणि बहीण रिमा जैन यांनी त्यांच्या संपत्तीवर अधिकार मागितला आहे.
राजीव कपूर यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना माहित नाही. राजीव कपूर यांनी २००१ मध्ये आरती सबरवाल यांच्याशी लग्न केलं. दोघांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे २००३ मध्ये ते विभक्त झाले होते. दोघे कधी सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेही नाहीत.
रणधीर कपूर आणि रिमा जैन यांच्या वकिलांनी म्हटलं की, राजीव यांच्या संपत्तीवर या दोघांचा हक्क आहे. त्यावर सुनावणीदरम्यान कोर्टाने दोघांना राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यावेळी त्यांच्या वकिलांनी घटस्फोटाची कागदपत्रं रिमा आणि रणधीर कपूर यांच्याकडे नसल्याचं सांगितलं. तसंच राजीव आणि आरती यांनी नक्की कोणत्या फॅमिली कोर्टातून घटस्फोट घेतला होता हे ही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
घटस्फोटाचे पेपर्स मिळत नसल्याने ही कागदपत्र सादर न करण्याची सूट देण्यात यावी असा अर्ज रिमा आणि रणधीर यांनी कोर्टात केला. न्यायालयाने रणधीर आणि रिमा यांचा हा अर्ज स्वीकारला आहे. पण न्यायाधीश गौतम यांनी रणधीर आणि रिमा यांना स्वीकृती पत्र देण्यास सांगितलं आहे.
आरती सबरवाल या आर्किटेक्ट आहेत. आरती सध्या कॅनडामध्ये राहतात.