‘अगं बाई अरेच्चा’ प्रदर्शित होऊन दहा वर्षे उलटल्यानंतर आता दिग्दर्शक के दार शिंदेंचा ‘अगं बाई अरेच्चा २’ हा सिक्वलपट प्रदर्शित होतो आहे. सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला हा चित्रपट आपल्यासाठी अनेक अर्थानी स्वप्नपूर्तीचा अनुभव देणारा चित्रपट आहे, असे म्हणणाऱ्या केदार शिंदे यांनी आपल्या चित्रपटाला दिग्दर्शक राजकु मार हिरानींची पहिली दाद मिळाल्याचेही सांगितले. हिरानींचा ‘मुन्नाभाई’ चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्याकडून सिक्वल बनवण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे काहीही करून त्यांच्यापर्यंत पोहोचायचे हा चंगच बांधलेल्या केदारच्या चित्रपटाला हिरानींची उपस्थितीही लाभली आणि त्यांच्याकडून दादही मिळाल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात गप्पा मारताना सांगितले.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा २’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय झाला आहे तो या चित्रपटाच्या धडाकेबाज प्रोमोजमुळे.. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारलेली शुभांगी कुडाळकर आणि तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांविषयीच्या गमतीजमती सांगणारा हा चित्रपट कुठे तरी ‘अगं बाई अरेच्चा’ या नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सूकता निर्माण करतो आहे. या दोन चित्रपटांचा संबंध, सोनालीची निवड, चित्रपटाला मिळालेला अवघ्या वीस वर्षांचा तरुण संगीतकार निषाद असे अनेक विषय दिग्दर्शक केदार शिंदे, सोनाली कुलकर्णी, निर्माता नरेंद्र फिरोदिया आणि निषाद यांनी गप्पांमधून उलगडून सांगितले. एक तर चांगली कथा असल्याशिवाय मी चित्रपट करत नाही.
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत आहे. तिच्याबरोबर काम करायचे आपले स्वप्न होते. मात्र, तिच्यासाठी समर्पक अशी भूमिका या चित्रपटात असल्याने तिचीच निवड करायची होती. ‘अगं बाई अरेच्चा २’मुळे तिच्याबरोबर काम करायची इच्छा पूर्ण झाली, असे केदार शिंदे यांनी सांगितले. या चित्रपटाचे निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्याशी तीन वर्षांपासून ओळख होती. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच चित्रपटनिर्मिती करता आली. चित्रपटाच्या बळावर ‘इरॉस’सारखी संस्था पुढे आली. इतक्या मोठय़ा संस्थेला मराठी चित्रपटसृष्टीत यावेसे वाटले. त्यामुळे मराठी चित्रपटांना नक्कीच फायदा होईल. अजय अतुलने पहिल्यांदा संगीतकार म्हणून ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाला संगीत दिले होते.
मला या चित्रपटासाठी वेगळे संगीत हवे होते. निषाद या अवघ्या वीस वर्षांच्या तरुणाने चित्रपटाला संगीत दिले आहे. तो संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडून शिकून आला आहे. या सगळ्या गोष्टी पाहता हा चित्रपट माझ्यासाठी सर्वार्थाने स्वप्नपूर्तीचा अनुभव देणारा आहे, असे केदार शिंदे यांनी स्पष्ट केले. तर आपल्या करिअरचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा किंवा आहे त्यात तृप्त रहावे अशा एका निर्णायक टप्प्यावर असताना केदार शिदेंनी शुभांगी कुडाळकरचीही गोड कथा आपल्या हातात ठेवली, असे सोनालीने सांगितले.
शुभांगी कुडाळकरची कथा मला जर ऐकायला आवडते आहे तर प्रेक्षकांनाही ती ऐकायला आवडणारच, या विचाराने चित्रपटाला होकार दिल्याचे सोनालीने सांगितले. तेवढी ताकद त्याच्या गोष्टीत आहे. पटकथा जशी सांगितली होती त्याहीपेक्षा चित्रपट किती तरी पटीने चांगला करण्यात केदार यशस्वी ठरला असल्याची कौतुकाची पावतीही सोनालीने दिली.
चित्रपटासाठी दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली एक कथा हाती लागली. त्यावर चित्रपट करायचा निर्णय पक्का झाला. तेव्हा हा ‘अगं बाई अरेच्चा’चा सिक्वल करायचा असा विचार केला नव्हता. मात्र, यातली जी शुभांगी कुडाळकरची कथा आहे ती ऐकल्यावर पुन्हा एकदा बायकांना ‘अगं बाई’ आणि पुरुषांना ‘अरेच्चा’ असे म्हणायला लावेल, याची खात्री पटल्यानंतर मग त्याला ‘अगं बाई अरेच्चा २’ हे नाव देण्यात आले
केदार शिंदे