सुपरस्टार रजनीकांत सध्या ‘जेलर २’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. ते लवकरच या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळतेय. परंतु, सध्या ते एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. रजनीकांत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये रजनीकांत त्यांच्या गाडीमधून जात असताना आजूबाजूला चाहत्यांनी गर्दी करीत त्यांना अभिवादन केलं. त्यांनीदेखील तिथे असलेल्या चाहत्यांना नमस्कार करीत प्रतिसाद दिला. रजनीकांत ‘जेलर २’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले असताना तिथे चाहत्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. यावेळी ते पांढऱ्या रंगाचा सदरा व लुंगी अशा साध्या पोशाखात पाहायला मिळाले. तर, ‘जेलर २’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, मागील दोन महिन्यांत चेन्नईमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. आता रजनीकांत केरळमध्ये चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी पोहोचले आहेत. त्यांच्यासह चित्रपटातील त्यांचे इतर सहकलाकार रम्या कृष्णन व मिर्ना मेननदेखील शूटिंगसाठी उपस्थित होते. लवकरच या चित्रपटाचं काम पूर्ण होणार आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये ‘जेलर २’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता आणि या टीजरला तब्बल १३ दशलक्ष इतके व्ह्युज मिळाले होते. टीजर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
‘जेलर २’ हा २०२३ साली आलेल्या ‘जेलर’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘जेलर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटाने जगभरात ६५० कोटींची कमाई केली. त्यामुळे आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटात रजनीकांत यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘जेलर’च्या पहिल्या भागाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. त्यामुळे आता त्याचा दुसरा भाग कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
#Jailer2 – Yet another day with fans greetings!#Rajinikanth #Superstar #Thalaivar ? pic.twitter.com/OnrVV8QTV1
— Rajini✰Followers (@RajiniFollowers) April 21, 2025
दरम्यान, ‘जेलर’ चित्रपटाची कथा सांगायची झाल्यास, मुथुवेल पंडियान (रजनीकांत) हा काही दिवसांपूर्वीच तुरुंगाधिकारी म्हणून निवृत्त झालाय. त्याचा मुलगा अर्जुन हा एसीपी आहे. तो कर्तव्यदक्ष आहे. बापासारखा मुलगादेखील धाडसी आहे. त्याला त्याच्या कर्तव्याची जाण आहे. मुथुवेलचं छोटं पण आनंदी कुटुंब आहे. सगळं काही सुरळीत सुरू असताना अर्जुनला अन्नाकोरममधील एका मंदिरातून सोन्याची मूर्ती चोरीला गेल्याचे कळते.
अर्जुन त्या मूर्तीच्या चोरी प्रकरणाचा तपास करू लागतो. तेव्हा त्याला धमक्या यायला सुरुवात होते. शेवटी त्याला काही गुंड पकडून घेऊन जातात. आपल्या मुलाला गुंडानं धमक्या देऊन, त्याचं अपहरण केलं आहे आणि आता त्याच्या जीवाला धोका आहे. त्याशिवाय कुटुंबावरही मृत्यूची टांगती तलवार असल्याचे मुथूला सांगण्यात येते. अशा प्रसंगात त्याच्यातील पूर्वीचा जेलर जागा होतो.