करोनामुळे गेली दोन वर्षे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कठीण राहिली आहेत. आधी करोनामुळे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत आणि त्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. अनेक बड्या अभिनेत्यांचे चित्रपट फ्लॉप झाले. चित्रपट अपयशी होत असल्याने थिएटर मालकांसमोरही मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे, त्यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा अवलंब केला जात आहेत. एवढंच नाही तर प्रेक्षकांना थिएटरमध्ये परत आणण्यासाठी काही जुने चित्रपटही पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत.
दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा एक चित्रपट तब्बल २० वर्षांनी प्रेक्षकांना सिनेमागृहात पुन्हा पाहायला मिळणार आहे. रजनीकांत यांचा ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. बाबा हा चित्रपट १० डिसेंबरला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शो सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहेत. याशिवाय खास बाब म्हणजे ‘बाबा’ चित्रपटाच्या तिकिटाची किंमत केवळ ९९ रुपये असेल. पण या चित्रपटाचे बहुतांश शो चेन्नईच्या कमला सिनेमातच चालवले जाणार आहेत. कमला सिनेमाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
‘बाबा’ हा चित्रपट २००२ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह अभिनेत्री मनीषा कोईराला, सुजाता आणि अमरीश पुरी यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. २० वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हाही या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे. १२ डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी १० डिसेंबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.