जयपूरस्थित ‘श्री राजपूत करनी सेने’च्या निदर्शकांनी ‘जयपूर साहित्य महोत्सवात’ शिरून एकता कपूरच्या सहभागाविरोधत घोषणाबाजी करून निदर्शने केली. एकता कपूरच्या ‘जोधा अकबर’ या टीव्ही मालिकेच्या शीर्षकाला त्यांचा विरोध आहे. या मालिकेचे नाव बदलण्याचे सांगूनदेखील एकताने मालिकेचे नाव न बदलल्याने ‘जयपूर साहित्य महोत्सवात’ एकता लेखक सिद्धार्थ धनवंत संघवी यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घातला.
एकताची मालिका जोधा आणि अकबर यांच्याविषयी चुकीची माहिती दाखवत आहे. जोधा अकबराची पत्नी नव्हती. या विषयी आमचा आक्षेप या आधीच आम्ही एकताकडे नोंदवला आहे. गेल्या वर्षी ती जयपूरमध्ये असताना मालिकेत बदल करण्याचे वचन देऊनसुद्धा आत्तापर्यंत तिने याबाबत काहीही केलेले नसल्याचे, करनी सेनेचे प्रमुख श्याम प्रताप सिंग म्हणाले, एकता जयपूर साहित्य महोत्सवात उपस्थित राहणार नसल्याच्या शक्यतेविषयी माध्यमातून समजल्याचा दावा निदर्शकांतर्फे करण्यात आला. करनी सभेचे महिपाल सिंग मकराना म्हणाले, या ठिकाणी ती येणार असल्याचे आम्हाला माहिती नव्हते. वृत्तपत्रातील बातम्यांतून ती येणार नसल्याचे समजले. जर ती राजस्थानची प्रतिमा मलिन करणार असेल, तर आम्ही तिला येथे पाऊल ठेवू देणार नाही.
दरम्यान, आंदोलकांना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर काढून कार्यक्रमाचे सत्र सुरू ठेवण्यात आले. ‘एसएचओ’ अशोक नगर हरशराज सिंग म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळजवळ १० तरुणांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. त्यांना तातडीने कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले.
दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक  ग्यान चंद म्हणाले, एकता कपूरचे सत्र सुरू असताना ‘जोधा अकबर’ टीव्ही मालिकेवरून तिच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या तरुणांनी स्वत:ची ओळख श्री राजपूत करनी सेनेचे कार्यकर्ते म्हणून करून दिली.

Story img Loader