विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं २१ सप्टेंबर रोजी निधन झालं होतं. १० ऑगस्टला त्यांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तब्बल ४० दिवस त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर जवळपास चार महिन्यांनी त्यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव हिने भाष्य केलंय. आपल्या वडिलांच्या निधनासाठी संबंधित जिमला जबाबदार धरलं जाऊ नये, असं तिचं म्हणणं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अंतरा म्हणाली, “काहीही झालं तरी ते जिमला जाण्यासाठी प्रयत्नशील असायचे. ते त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल खूप जागरूक होते. ते किमान दर दुसऱ्या दिवशी जिमला जायचे. जेव्हा ते घराबाहेर असायचे, तेव्हा ते तिकडे जिम शोधायचे, अगदी त्यांच्या कारमधून बाहेर बघत असतानाही त्यांची नजर जिम शोधत असायचे. आमच्या कुटुंबात व्यायाम न करणाऱ्या सदस्यांसाठी ते प्रेरणा होते. त्यांच्याबरोबर जे काही घडलं, तो केवळ अपघात होता, जो जिम करत असताना घडला. त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे कुणीही संबंधित जिमला दोष देऊ नये.”
मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…
राजू श्रीवास्तव ‘लाफ्टर चॅम्पियन’साठी शूटिंग करत होते आणि अनेकदा टूरवर जायचे. वडिलांशी शेवटचं कधी बोलली होती हे आठवून अंतरा म्हणाली, “आयुष्य कधीच सांगत नाही की कोणत्या तरी गोष्टीची ही तुमची शेवटची वेळ असणार आहे. त्यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी १० दिवसांपासून ते शहराबाहेर होते. माझ्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर त्यांनी ‘लाफ्टर चॅम्पियन’साठी शूटिंग केलं होतं. आम्ही माझा वाढदिवस साजरा केला आणि त्यांनी तिथे काही जोक्स केले होते. त्यानंतर ते शूटसाठी निघून गेले. ते अनेकदा टूरसाठी जात असायचे. त्यामुळे आम्ही शेवटचं त्यांच्याशी नेमकं कधी बोललो, ते आठवत नाही,” असं अंतराने सांगितलं.