आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सतत त्यांचे चाहते आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आता त्यांना शुद्धीत आणण्यासाठी डॉक्टरांनी एक नवी युक्ती शोधून काढली आहे.

राजू श्रीवास्तव हे बुधवारी १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालवली. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर विविध उपचार पद्धतींचा वापर करत आहे. आता डॉक्टरांनी त्यांच्या उपचारासाठी न्यूरोफिजियोथेरेपीचा वापर करणे सुरु केले आहे.

व्हेंटिलेटरवर असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची सुरक्षा वाढवली, जाणून घ्या काय आहे कारण

न्यूरोफिजियोथेरेपी या उपचार पद्धतीत रुग्णांना त्यांच्या आवडत्या लोकांचा आवाज ऐकवला जातो जे त्यांच्या फार जवळ असतात. त्या आवाजामुळे रुग्णाची हरपलेली शुद्ध परत येते, असे म्हटले जाते. सध्या याच थेरेपीचा वापर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी केला जात आहे. या उपचारपद्धतीसाठी त्यांना कोणत्याही कुटुंबियांचा किंवा नातेवाईंकांचा नाही तर सिनेसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्याचा आवाज ऐकवला जात आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन आहेत.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी एक व्हॉईस नोट पाठवली होती. या व्हॉईस नोटमध्ये “उठ राजू आणि लोकांना पुन्हा हसायला शिकव…” असे अमिताभ बच्चन राजूला सांगत आहे. न्यूरोफिजियोथेरेपी दरम्यान अमिताभ बच्चन यांचा आवाज राजू श्रीवास्तव यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. त्यांच्या आवाजाला राजू श्रीवास्तव प्रतिसाद देतात की नाही याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना चाहते आणि कुटुंबियांकडून केली जात आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी नवी माहिती समोर, शेखर सुमन म्हणाले “देवाने प्रार्थना…”

दरम्यान राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.