आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. पण व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राजू श्रीवास्तव हे बुधवारी १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालवली. यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आलं होतं. यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याची माहिती कुटुंबियांनी डॉक्टरांना दिली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी नवी माहिती समोर, शेखर सुमन म्हणाले “देवाने प्रार्थना…”

रुग्णालयाच्या सुरक्षेतही वाढ

एकीकडे राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल चांगली माहिती समोर येत असताना दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अज्ञात व्यक्तीने आयसीयूमध्ये जाऊन राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर त्या अज्ञात व्यक्तीची रुग्णालय प्रशासनाने चौकशी केली आहे. ही अज्ञात व्यक्ती नेमकी कोण? त्याने राजू श्रीवास्तव असलेल्या आयसीयू कक्षात जाण्याचा प्रयत्न कसा केला? त्याने हे कशासाठी केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घडलेल्या प्रकारानंतर राजू श्रीवास्तव याचे कुटुंबीय चिंतेत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. यानंतर रुग्णालयाने राजू श्रीवास्तव यांच्या आयसीयू बाहेर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. तसेच रुग्णालयाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता कोणलाही परवानगीशिवाय त्याठिकाणी जाता येणार नाही, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

“देवाने आम्हा सर्वांच्या प्रार्थना ऐकल्या”

दरम्यान कॉमेडियन शेखर सुमन यांनी काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. यात ते म्हणाले, “राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कालच्या तुलनेत त्यांची प्रकृती आज बरी आहे. सर्वोत्तम डॉक्टर, न्यूरोसर्जन्स त्यांची काळजी घेत आहेत. पण पूर्वीपेक्षा आता त्यांच्या तब्येतीत बराच फरक पडल्याचे दिसत आहे.”

विश्लेषण : रिक्षाचालक ते स्टँडअप कॉमेडियन, राजू श्रीवास्तवचा प्रवास जाणून घ्या

“राजू श्रीवास्तव यांची इच्छाशक्ती फार प्रबळ आहे आणि त्या जोरावर ते याच्याशी लढतील. आता त्यांचे अवयवही काम करत आहेत. जरी ते बेशुद्ध असले तरी त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. देवाने आम्हा सर्वांच्या प्रार्थना ऐकल्या. हर हर महादेव”, असे शेखर सुमन यांनी म्हटले होते.