आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोललं जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूनेही काम करण्याचं बंद केल्याची माहिती त्यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरासह विदेशातून प्रार्थना केली जात आहे. नुकतंच राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव हिने त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली.
राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा हिने नुकतंच ईटाइम्सोबतच बातचीत केली. यावेळी तिने सर्व प्रसारमाध्यमांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. “राजू यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या विविध अफवा पसरवणं बंद करा. कारण हे फारच त्रासदायक आहे”, असे त्या यावेळी म्हणाल्या.
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा
“राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि डॉक्टर त्यांचे काम चोखपणे करत आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण रुग्णालय प्रशासन दिवसरात्र काम करत आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. राजू हे लढवय्ये आहे आणि ते ही लढाई जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे. तो नक्कीच संघर्ष करेल आणि तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी परत येईल. हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेकजण प्रार्थना आणि पूजा करत आहेत. या प्रार्थना व्यर्थ जाणार नाही, याची मला कल्पना आहे. मला फक्त सर्वांना विनंती करायची आहे की त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी”, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
“डॉक्टर हे देवाचे रुप असल्याचे आपण मानतो. ते खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे सध्या व्हायरल होणाऱ्या अफवा या निराधार आहेत. सर्व काही नीट आहे. ते हा संघर्ष करत असून आपल्याला त्याची धीराने वाट पहावी लागेल. डॉक्टर आणि राजू हे दोघेही लढत आहेत आणि लवकरच याचे सकारात्मक परिणाम सर्वांना मिळतील. मी वचन देते की राजू पुन्हा तुम्हा सर्वांचे मनोरंजन करेल आणि करत राहिल”, असेही त्यांनी सांगितले.
“मी हात जोडून लोकांना विनंती करतेय की कृपया राजूच्या प्रकृतीबद्दल विविध अफवा पसरवणे थांबवा. या अफवांमुळे कुटुंब, डॉक्टर आणि सगळेच नैतिकदृष्ट्या खचले आहेत. ते त्यांचे सर्वोत्तम देत आहेत आणि त्यांच्यावर या नकारात्मकत गोष्टींचा प्रभाव पडू नये अशी आमची इच्छा आहे. आता आम्हाला प्रार्थनांची गरज आहे. त्यामुळे नकारात्मक बातम्या पसरवणे थांबवा. या अफवा खूप त्रासदायक आहेत”, असेही त्या म्हणाल्या.