Rakesh Bedi : आजपर्यंत अनेक कलाकारांनी मुंबईतले रस्ते, खड्डे, साठलेलं पाणी याबाबत भाष्य केलं आहे. अनेक मराठी कलाकारांनी तसंच हिंदी कलाकारांनी यावर व्हिडीओ किंवा एक्स पोस्ट केल्या आहेत. आता हिंदी मालिका विश्वातले कलाकार राकेश बेदी यांनी मुंबई महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एका व्हिडीओ द्वारे समोर आणला आहे. इतकंच नाही तर मुंबई महापालिकेची अवस्था ही दाढी-मिशी अर्धवट सोडून पळणाऱ्या न्हाव्यासारखी आहे असंही म्हटलं आहे. राकेश बेदींचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
काय म्हटलं आहे राकेश बेदींनी?
“हॅलो मित्रांनो, मी राकेश बेदी. मी आत्ता माझ्या घरासमोर उभा आहे. तुम्ही या रस्त्याची अवस्था बघत असाल. हा रस्ता बघा कसा अर्धवट बांधून सोडून दिला आहे. मुंबई महापालिकेचे म्हणजेच बीएमसीचे लोक रस्ता असाच अर्धवट बांधून निघून गेले आहेत. जुन्या काळात गावातले न्हावी गिऱ्हाईकाची अर्धी मिशी कापून पळायचे तसाच हा प्रकार आहे. मग ते ग्राहक न्हाव्याला शोधत फिरायचे अरे बाबा अर्धवट ठेवलेली मिशी किंवा दाढी करुन दे. अगदी तशीच अवस्था या रस्त्याची आहे. या ठिकाणी मी राहतो, जॉनी लिव्हर राहतात, सोनू सूद पुढच्या इमारतीत राहतात. तरीही या रस्त्याची अवस्था होणारं ट्रॅफिक बघा. कशी अवस्था झाली आहे.” असं राकेश बेदींनी या व्हिडीओत म्हटलं आहे.
रस्त्याचं काम अर्धवट टाकून बीएमसीचे लोक निघून गेले-राकेश बेदी
राकेश बेदी पुढे म्हणत आहेत, “रस्त्याचं काम अर्धवट टाकून बीमएसीचे लोक पसार झाले आहेत. कुणीतरी तक्रार केल्यावर कळलं हा रस्ता बीएमसीचा नव्हता. आता या ठिकाणी कुणीही काम करत नाही. त्यामुळे या अर्धवट रस्त्यावरुन जाताना लोकांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. जर हा रस्ता बीएमसीचा नव्हता तर टेंडर कसं काय पास झालं? जर टेंडर निघालं काम सुरु झालं याचाच अर्थ हा बीएमसीचा रस्ता आहे.” असंही राकेश बेदी त्यांच्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.
राकेश बेदी हे एक उत्तम मालिका आणि सिने कलाकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. येस बॉस, उरी या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. तसंच श्रीमान श्रीमती या मालिकेतून ते घरा घरांत पोहचले. आता त्यांनी त्यांच्या इमारतीसमोर अर्धवट बांधण्यात आलेल्या रस्त्यावरुन महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.