अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला आहे. मुलगा ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत वडिलांच्या आजारपणाबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच ह्रतिक रोशनने एक भावनिक पोस्टदेखील शेअर केली आहे.

ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आज सकाळी मी वडिलांना सोबत एक फोटो काढण्यासाठी विचारलं. सर्जरीच्या दिवशीही ते जीमला येणं विसरणार नाहीत याची खात्री होती. माझ्या परिचयात असणाऱ्यांपैकी ते सर्वात कणखर व्यक्ती आहते. काही आठवड्यांपूर्वी त्यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. पण या लढ्याला ते अत्यंत उमेदीने सामोरं जात आहेत. आम्हाला त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख लाभला हे आमचं भाग्य आहे’.

राकेश रोशन यांनी ‘घर घर की कहानी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. खूबसूरत, खेल खेल मै चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. दिग्दर्शनातही राकेश रोशन यांना चांगलंच यश मिळालं. कोई मिल गया, कहो ना प्यार है, करण अर्जून आणि खून भरी मांग हे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशन हिलादेखील कॅन्सर झाला होता. मात्र तिने त्याच्यावर मात केली होती.

Story img Loader