राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी हे दोघे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राखी सावंतने आदिलबरोबर लग्न केल्याची घोषणा आठवडाभरापूर्वी केली होती. शिवाय तिने तिच्या लग्नाचे काही फोटोसुद्धा शेअर केले होते. मात्र त्यानंतर आदिलने राखीबरोबरच्या लग्नाला दुजोरा देण्यास टाळाटाळ केली होती. अखेर आता आदिलने एक पोस्ट शेअर करत लग्नाची कबुली दिली आहे.
इतकंच नव्हे तर त्याने राखीला त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. आदिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर राखीबरोबरच्या लग्नाचा एक फोटोही शेअर केला आहे. या पोस्टखाली राखीने ही कॉमेंट करत आदिलचे आभार मानले आहेत.
याबरोबरच राखीची आई रुग्णालयात दाखल असल्यानेही ती चांगलीच चर्चेत आहे. एकूणच नेटकऱ्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला राखी कंटाळली आहे, हे तिच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये स्पष्ट दिसत आहे. नुकतीच ती तिच्या एका चाहत्यावर चांगलीच भडकली आहे, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका कॉफी शॉपच्या बाहेर राखीला पाहिल्यावर एक चाहता तिच्यापाशी आला आणि सेल्फी घेण्यासाठी विनंती केली. नंतर तो चाहता राखीच्या अगदी जवळ येऊन चिकटून फोटो काढू लागल्यावर राखी त्याच्यावर भडकली. राखी म्हणाली, “थोडं दुरून फोटो काढा, माझं लग्न झालं आहे, पहिले गोष्ट वेगळी होती आता तुम्ही मला अशा पद्धतीने स्पर्श करू शकत नाही.” राखीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकांनी तिच्या अशा वर्तणूकीमुळे पुन्हा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.