‘बोल्ड अँड बिनधास्त’ इमेजने नेहमीच लक्ष वेधणारी राखी सावंत ‘जयजयकार’ या मराठी सिनेमाद्वारे चित्रपट निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. शंतनू रोडे दिग्दर्शित जयजयकार या मराठी सिनेमाच्या निर्मितीच्या योगदानात तिचा महत्वाचा सहभाग आहे. निर्माते राहुल कपूर, शंतनू रोडे, चंद्रशेखर नन्नावरे यांच्यासह तिने ‘फेथ इनकॉर्पोरेट मुव्हीज प्रा. लि.’ प्रस्तुत, ‘शून्य क्रिएशन्स’ निर्मित ‘जयजयकार’ सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रदर्शनापूर्वीच अनेक महोत्त्सवांमध्ये ठसा उमटविलेल्या ‘जयजयकार’ चित्रपटाच्या माध्यमातून राखीने निर्मितीत व लेखक शंतनू रोडे यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय.
एखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवले, तर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतो. हा या चित्रपटाचा मध्यवर्ती विचार असून तो मांडलाय तृतीयपंथीयांची एक टोळी आणि एक अवलिया मेजर यांच्यातील जुगलबंदीमधून. दिलीप प्रभावळकरांनी साकारलेला मेजर अखंड आणि तृतीयपंथीयांच्या भूमिकेत संजय कुलकर्णी, भूषण बोरगांवकर, धवल पोकळे, आकाश शिंदे या यांनी धमाल उडवून दिली आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या जयजयकार मधील हे तृतीयपंथी रडणारे, सतत दु:खी असणारे नाहीत; तर हसणारे, धमाल करणारे, प्रगतीचे स्वप्न बघणारे तुम्हा-आम्हा सारखे सामान्य लोक आहेत. सध्या सुरु असणाऱ्या निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये लेखक- दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या या सिनेमाची दखल घेण्यात आली आहे हे विशेष. दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा उत्साह या सिनेमातही तरुणांना लाजवेल असा आहे. राखी सावंत यांची निर्माती म्हणून नवी इनिंग लक्षवेधी ठरणार आहे.
चित्रपटाची वेगळ्या धाटणीची कथा शंतनू रोडे यांनी लिहिली असून दिलीप प्रभावळकर, संजय कुलकर्णी, भूषण बोरगांवकर, धवल पोकळे, आकाश शिंदे यांच्यासह सुहिता थत्तेंचीही महत्वाची भूमिका आहे.

Story img Loader