ड्रामा क्वीन राखी सावंत मागच्या काही वर्षांपासून तिचं लग्न आणि पती या गोष्टींमुळे सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत होती. अखेर बिग बॉसच्या १५ व्या पर्वात राखीचा पती कोण याचा खुलासा झाला होता. राखीनं बिग बॉसच्या घरात अखेर पती रितेशची सर्वांशी ओळख करून दिली होती. पण आता राखी सावंतनं पती रितेशपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती तिनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली.
राखी सावंतनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने एक लांबलचक नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने पती रितेशपासून वेगळं होत असल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, आमच्या दोघांमधील समस्या संपवण्याचा प्रयत्न केला. पण यात आम्ही यशस्वी झालो नाही. त्यामुळेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
राखी सावंतनं आपल्या नोटमध्ये लिहिलं, ‘सर्व चाहते आणि माझ्या प्रिय व्यक्तींना मी सांगू इच्छिते, मी आणि रितेश एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाच्या बाहेर होत्या. आम्ही पूर्ण प्रयत्न केले. मात्र अखेर आम्ही आमचं आयुष्य वेगवेगळं जगण्याचा निर्णय घेतला आहे.’
राखीनं या नोटमध्ये पुढे लिहिलं, ‘हे सर्व व्हॅलेंटाइन डेच्या अगदीच अगोदर घडलं त्यामुळे मी खूप दुःखी आहे. पण एक निर्णय तर घ्यायचाच होता. पण मी प्रार्थना करते की रितेशसोबत सर्वकाही चांगलं होऊ दे. मला आता कामावर फोकस करायचं आहे. मला आनंदी आणि निरोगी राहायचं आहे. मला समजून घेण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद.’
राखीच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सच्या मते राखी सावंत आणि रितेश फक्त बिग बॉस १५ साठी एकत्र आले होते. त्यामुळेच आता ते दोघं वेगळे होत आहेत. दरम्यान राखी सावंतसोबत लग्न करण्याआधीच रितेश विवाहित आहे. याचा खुलासा स्वतः राखीनं बिग बॉस १४ मध्ये केला होता.